Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 04:19 PM2024-10-27T16:19:14+5:302024-10-27T16:20:07+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाची काल दुसरी यादी जाहीर झाली, या यादीत शिराळा विधानसभेसाठी सत्यजित देशमुख यांना उमेदवारी मिळाली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपाने काल उमेदवारांची यादी जाहीर केली. शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान,आता या मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. शिराळा विधानसभेतील भाजपा नेते सम्राट महाडिक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
शिराळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मानसिंगराव नाईक हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाकडून सत्यजित देशमुख आणि सम्राट महाडिक यांनी उमेदवारीसाठी दावा केला होता. काल भाजपाच्या जाहीर झालेल्या यादीत सत्यजित देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे महाडिक गट नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. दरम्यान, आज महाडिक गटाने कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात महाडिक गटाकडून निवडणूक लढवण्यावर कार्यकर्त्यांनी आग्रह केला.
मेळाव्यानंतर भाजपा नेते सम्राट महाडिक यांनी माध्यमांना आपली भूमिका सांगितली. यावेळी बोलताना सम्राट महाडिक म्हणाले, आज झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी ही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. गेल्या दहा वर्षापासून आम्ही आणि आमचे कार्यकर्ते या मतदारसंघात काम करत आहे. गेल्या पाच वर्षापूर्वी भाजपाची राज्यात सत्ता नसताना आम्ही भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आम्हाला पक्षश्रेष्ठींना तिकीट देण्याचा शब्द दिला होता. त्यावर आम्ही प्रवेश केला, पाच वर्षात आम्ही पक्ष वाढवण्याचे काम केले. शब्द पाळला नसल्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा तीव्र आहे, त्यामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे. उद्या आम्ही अपक्ष अर्ज दाखल करणार आहे, असेही सम्राट महाडिक म्हणाले.
भाजपा नेते सम्राट महाडिक यांनी अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता शिराळा विधानसभा मतदारसंघासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. शिराळा विधानसभा आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात महाडिक गटाची मोठी ताकद आहे. यामुळे दोन्ही मतदारसंघात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
इस्लामपूर विधानसभेतही बंडखोरी होणार?
महाडिक गटाची इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातही ताकद आहे. महायुतीकडून या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निशिकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, आता सम्राट महाडिक यांचे बंधू राहुल महाडिक या मतदारसंघात इच्छुक होते. दरम्यान, राहुल महाडिक यांनी दोन दिवसात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे, यामुळे या मतदारसंघातही बंडखोरी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.