Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 08:19 PM2024-11-05T20:19:23+5:302024-11-05T20:23:08+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आमदार विश्वजीत कदम यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काल ४ नोव्हेंबर अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता, आजपासून प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विश्वजीत कदम निवडणूक लढवत आहेत, त्यांनी पलूसमधून प्रचार सभा सुरु केली आहे. यावेळी त्यांनी महायुतीवर टीका केली.
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
आमदार विश्वजीत कदम यांनी यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीवर निशाणा साधला. विश्वजीत कदम म्हणाले, महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती आहे, फसून जाऊ नका. कर्नाटकात काँग्रेसने २ हजार रुपये दिले. राहुल गांधी यांनी ही योजना महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर कायम चालू ठेवणार असं सांगितलं आहे. या योजनेत आम्ही पैसे वाढवून देणार आहे, असंही विश्वजीत कदम म्हणाले.
सांगली विधानसभेत विशाल पाटलांचा जयश्री पाटलांना पाठिंबा
लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेली. अनेक प्रयत्न करूनही काँग्रेसला ही जागा मिळाली नाही. अखेर इच्छूक उमेदवार विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर या सांगली पॅटर्नची चर्चा राज्यभरात झाली. विधानसभा निवडणुकीतही सांगली पॅटर्नची चर्चा आहे. अनेक ठिकाणी हा पॅटर्न राबवण्याकडे उमेदवारांचा कल असल्याचेही पाहायला मिळत आहे. यातच आता विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. जयश्री पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना विशाल पाटील यांनी जयश्री पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार
जयश्री पाटील यांची उमेदवारी ही महाविकास आघाडीची उमेदवारी आहे, असे मी जाहीर करतो. कारण मी खासदार म्हणून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. जसे लोकसभेत काँग्रेसचे ९९ खासदार निवडून आले आणि शंभरावा मी होतो, तसे जयश्री पाटील शंभराव्या आमदार असतील. आता संघर्ष संपला पाहिजे ही आमची भूमिका होती. जयश्री पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवून देण्यात आम्ही कमी पडलो. सातत्याने आमच्या कुटुंबावर अन्याय होत गेला? का न्याय मिळत नाही हे कळत नाही. जयश्री पाटील लोकसभेला सर्वात पुढे होत्या. मग मी का त्यांच्या सभेला येऊ नये? ही महाविकास आघाडी फक्त तीन पक्षाची नाही. यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, विशाल पाटील अपक्ष म्हणून याच विकास आघाडीचा घटक आहे, असे विशाल पाटील म्हणाले.