Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी अयोध्येत का गेले नाहीत?; अमित शाहांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 04:04 PM2024-11-08T16:04:28+5:302024-11-08T16:06:16+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारसभांना सुरुवात झाली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे अमित शाह यांनी जाहीर सभा घेतली, या सभेत अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. तसेच अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरुन खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
महायुतीने आजपासून मोठ्या सभांना सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी धुळे तर अमित शाहांनी पश्चिम महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरु केला आहे. अमित शाह यांनी पहिली जाहीर सभा सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसला जाहीरनामावरुन टोला लगावला. तर अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांना डिवचले.
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले, गेल्या कित्येक वर्षापासून राम मंदिराचा प्रश्न सुरू होता. काँग्रेस राम मंदिराचा प्रश्न सोडवत नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले आणि पाच वर्षात भूमिपूजनही केले, बांधकामही पूर्ण केले आणि जय श्रीराम केले. प्राणप्रतिष्ठा सोहळावेळी शरद पवार म्हणाले, मी नंतर येईन. उद्धव ठाकरे, राहुल गांधीही गेले नाहीत. ते अयोध्येला का गेले नाही सांगा. त्यांना त्यांच्या व्होट बँकेचे भीती वाटते, असा खोचक टोला केंद्री मंत्री अमित शाह यांनी लगावला.
"आम्ही भाजपावाले त्यांच्या व्होट बँकेला घाबरत नाही. आम्ही काशीविश्वनाथचे कॉरीडॉर बनवले, सोमनाथचे मंदिरही बनत आहे, असंही केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले.
अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
'काँग्रेसचे अध्यक्षच सांगतात काँग्रेस जी आश्वासनं देतं ती काल्पनिक आहेत, ती कधीच पूर्ण होणार नाहीत. पण मी आज तुम्हाला सांगतो, मोदींनी जी आश्वासने दिलीत ती आम्ही पूर्ण केली आहेत. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे, उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला तर काँग्रेसमध्ये डझनभर नेते मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, असा खोचक टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर केला.