महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती खुंटली - पृथ्वीराज चव्हाण
By शरद जाधव | Published: January 8, 2024 08:07 PM2024-01-08T20:07:58+5:302024-01-08T20:08:14+5:30
सांगली, मिरज आणि कुपवाडमधील विविध औद्योगिक संघटनांच्या पुढाकाराने आयोजित ‘उद्योगाची सद्यस्थिती व अडीअडचणी’ विषयावर परिसंवादात ते बोलत होते.
सांगली : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून असलेली राजकीय अस्थिरता, उद्योगवाढीस प्रोत्साहन देण्याबाबत सरकारची उदासीनता आणि इतर कारणांमुळे राज्यातील उद्योग अडचणीत आले आहेत. परदेशी उद्योग आणि गुंतवणूक आल्यास स्थानिक उद्योगांनाही उभारी मिळत असते. मात्र, सर्वच पातळीवर उद्योगाला दुय्यम स्थान देण्यात येत असल्याने महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती खुंटली आहे. त्यामुळे उद्योजकांसमोर आव्हाने निर्माण झाली आहेत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगलीत केले.
सांगली, मिरज आणि कुपवाडमधील विविध औद्योगिक संघटनांच्या पुढाकाराने आयोजित ‘उद्योगाची सद्यस्थिती व अडीअडचणी’ विषयावर परिसंवादात ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून अनेक उद्योग आपल्या राज्याकडे पाठ फिरवत आहेत. उद्योगांना मजबुती मिळण्यासाठी शासनाचे धोरण स्पष्ट पाहिजे. मात्र, राज्यातच राजकीय अस्थिरता असल्याने त्याचा थेट परिणाम उद्योगक्षेत्रावरही होत आहे. सत्तेत असलेले सरकार उद्योगाच्या समस्या सोडविण्यापेक्षा स्वत:चे सरकार वाचविण्यासाठी जादा प्राधान्य देत आहे.
२०२८ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था १ लाख कोटी रुपयापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट घेण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ही घोषणा अवघड आहे. राज्यातील बेरोजगारीची समस्या मिटण्यासाठी विकासदर १२ टक्क्यांपर्यंत गेला पाहिजे. मात्र, औद्योगिक क्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण नसल्याने ही उद्दिष्टपूर्ती तितकी सहजसाध्य नसल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, ज्येष्ठ उद्योजक मोहन जैन, सांगली औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सचिन पाटील, सतीश मालू, चंद्रकांत पाटील, अनंत चिमड, विजय भगत यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.