सांगलीत धोकादायक गांधी वसतिगृहात दीडशेवर विद्यार्थ्यांचा मुक्काम, शिक्षण विभाग म्हणतो..
By अशोक डोंबाळे | Published: August 22, 2023 05:55 PM2023-08-22T17:55:27+5:302023-08-22T17:56:21+5:30
वसतिगृहाची जबाबदारी नक्की कुणाची ?
अशोक डोंबाळे
सांगली : जिल्हा परिषद बांधकाम विभागाने एप्रिल २०२२ मध्ये सांगलीतील महात्मा गांधी वसतिगृहाची इमारत धोकादायक ठरवली आहे. या धोकादायक इमारतीमध्ये सध्या जवळपास दीडशेवर विद्यार्थ्यांचा अनधिकृत मुक्काम आहे. वसतिगृहाची इमारत पूर्णत: जीर्ण झालेली असून, स्लॅबचा काही भाग केव्हाही कोसळेल, अशा स्थितीमध्ये आहे. जिल्हा परिषदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या वसतिगृहाच्या दुरवस्थेबद्दल प्रशासनाची एवढी अनास्था का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महात्मा गांधी वसतिगृह हे जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रेरणेचे प्रतीक आहे. या वसतिगृहात राहून जिल्ह्यातील विविध क्षेत्रात नामांकित कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व घडली आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकमेव गांधी वसतिगृहाचा आधार आहे. या वसतिगृहाची सध्या खूपच वाईट अवस्था झाली आहे. इमारत जीर्ण झाली असून, स्लॅबचा काही भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, अभ्यासिका, विजेची व्यवस्था नाही. हे वसतिगृह जिल्हा परिषदेपासून अत्यंत जवळ असूनही त्याकडे अधिकारी कधीच लक्ष देत नाहीत. यामुळे वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाने एप्रिल २०२२ मध्ये महात्मा गांधी वसतिगृहाची इमारत धोकादायक असल्याचे जाहीर करून तसा अहवाल दिला आहे. तरीही या धोकादायक वसतिगृहात सध्या दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांचा मुक्काम आहे. काही नोकरदारांचाही मुक्काम आहे. या जीर्ण झालेल्या इमारतीत एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ? असाही सवाल उपस्थित होत आहे.
वसतिगृहाची जबाबदारी नक्की कुणाची ?
समाज कल्याण विभागाकडे महात्मा गांधी वसतिगृहाच्या प्रवेशाची जबाबदारी होती. म्हणून समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब कामत यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी गांधी वसतिगृहाची जबाबदारी आमच्याकडे नसून प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे आहे, असे सांगितले. शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वसतिगृहात महाविद्यालयीन विद्यार्थी राहात असून, त्याची जबाबदारी आमच्याकडे नाही. परंतु, वरिष्ठांनी सांगितले म्हणून आम्ही लक्ष देत आहोत. गांधी वसतिगृहाची इमारत धोकादायक असल्यामुळे एकाही विद्यार्थ्याला आम्ही प्रवेश दिलेला नाही.
नोकरदारांच्या पार्टी
महात्मा गांधी वसतिगृह गोरगरीब विद्यार्थ्यांची सांगलीत शिक्षणाची सोय व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेन बांधले आहे; पण सध्या या वसतिगृहात विद्यार्थी कमी आणि नोकरदारांचीच संख्या जास्त आहे. त्यामध्येही काही नोकरदार मद्यपींच्या पार्ट्याही रंगत असून त्याचा विद्यार्थ्यांना त्रासही होत आहे; पण विद्यार्थी त्यावर काहीच बोलू शकत नाहीत. जिल्हा परिषदही त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही, अशी परिस्थिती आहे.
नवीन इमारत कधी?
गांधी वसतिगृहाची इमारत धोकादायक आहे. या ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यायी वसतिगृहांत राहण्याची व्यवस्था करण्याची गरज होती; पण गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केले आहे, तसेच जिल्हा परिषदेत सध्या प्रशासक राज असून त्यांनीही धोकादायक इमारत पाडून नवीन इमारत बांधकामाच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न केले नसल्याचे दिसून आले.
विद्यार्थ्यांची गैरसोय
वसतिगृहाची इमारत धोकादायक असल्यामुळे तिथे कुणालाही प्रवेश दिला जात नाही. यामुळे ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसाेय होत आहे, तरीही याकडे खासदार, आमदार, मंत्री यापैकी कुणाचेच लक्ष नसल्याबद्दल विद्यार्थ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
सांगलीतील महात्मा गांधी वसतिगृह धोकादायक असल्यामुळे तेथे प्रवेश बंद आहेत. विद्यार्थी अनधिकृतपणे राहात असतील तर त्यांच्यावर जिल्हा परिषद कारवाई करणार आहे. वसतिगृहाची मूळ इमारत धोकादायक झाल्यामुळे ती पाडून नवीन बांधण्याबाबत प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. - तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद