मथुरेतील महिलेसाठी धावली महाराष्टची एक्स्प्रेस-दुर्मिळ रक्तगटाची कहाणी : तासगाव, शिर्डीच्या रक्तदात्यांनी जिंकली मथुरा, आग्रावासीयांची मने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:50 AM2018-06-28T00:50:34+5:302018-06-28T00:59:16+5:30
जात, धर्म, प्रांत, भाषा यांचे बांध तोडून जोडल्या जाणाऱ्या रक्ताच्या नात्यांमधून माणुसकीचे बीज हृदयांमध्ये पेरले जाते. तासगाव (जि. सांगली) व शिर्डी (जि. अहमदनगर) येथील दोन तरुणांनी उत्तर प्रदेशमधील मथुरेच्या एका गर्भवती
अविनाश कोळी ।
सांगली : जात, धर्म, प्रांत, भाषा यांचे बांध तोडून जोडल्या जाणाऱ्या रक्ताच्या नात्यांमधून माणुसकीचे बीज हृदयांमध्ये पेरले जाते. तासगाव (जि. सांगली) व शिर्डी (जि. अहमदनगर) येथील दोन तरुणांनी उत्तर प्रदेशमधील मथुरेच्या एका गर्भवती महिलेला व तिच्या पोटातील बाळाला जीवदान देत अशीच माणुसकीची सुंदर कहाणी नोंदविली. दोन जिवांसाठी जीवतोड धावाधाव करीत या दोन्ही रक्तदात्यांनी केलेल्या मदतीने उत्तर प्रदेशवासीयांची मने जिंकली.
पूनम शर्मा (वय २५, रा. मथुरा, उत्तर प्रदेश) या आठ महिन्यांच्या गर्भवतीस आग्राजवळील कमलानगर येथे बीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती चिंताजनक होती. हिमोग्लोबीनचे प्रमाण अवघ्या ३ वर आले होते. तिला तातडीने रक्ताची गरज होती. रक्त तपासणी केल्यानंतर तिचा ‘बॉम्बे ओ’ हा अत्यंत दुर्मिळ रक्तगट असल्याचे दिसून आले. जवळपासच्या सर्व रक्तपेढ्यांमध्ये याच्या उपलब्धतेबद्दल चौकशी करण्यात आली. संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये शोधाशोध करूनही या गटातील रक्त उपलब्ध झाले नाही. सोशल मीडियावर याबाबतीत एक संदेश व्हायरल करण्यात आला. तो फिरत फिरत तासगावच्या विक्रम यादव यांच्या ग्रुपवर आला.
विक्रम यादव हे स्वत: ‘बॉम्बे ओ’ या दुर्मिळ रक्तगटातील असून, त्यांनी संपूर्ण महाराष्टत आणि अन्य राज्यांमध्ये या दुर्मिळ रक्तगटाची मोठी चळवळ उभी केली आहे. त्यामुळे त्यांनी या मेसेजची दखल घेत संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधला. त्यांनी महिलेची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने अवघ्या काही तासात दोन बाटल्या रक्त उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे त्यांना सांगितले. यादव यांनी हे आव्हान स्वीकारले. त्यांनी शिर्डी येथील संबंधित रक्तगटातील रवी आष्टेकर यांना संपर्क साधला आणि त्यांना रक्तदानाचे आवाहन केले.
दोघांची तिथून धावाधाव सुरू झाली. जवळपास दीड हजार किलोमीटरचे हे अंतर त्यांनी अवघ्या १३ तासात पार केले. थोडा जरी विलंब झाला असता तर, त्या गर्भवती महिलेचा जीव धोक्यात आला असता. त्यामुळे वेळेत पोहोचण्याची चिंता या दोन्ही तरुणांना लागली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. ते रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि रुग्णालयाचे डॉक्टर, कर्मचारी यांचाही जीव भांड्यात पडला आणि लगेच रक्तदानाची प्रक्रिया सुरू झाली. रक्तदान झाल्यानंतर दोन्ही जिवांचा
धोका टळल्यानंतर सर्वांनी हसतमुखाने या दोन्ही रक्तदात्यांचे आभार मानले. .
आग्रा येथील सरकारी रुग्णालयात विक्रम यादव यांनी रक्तदान केले. यावेळी रुग्णाचे नातेवाईक व रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.
पदरमोड करून दान
आग्रा येथील बीएम रुग्णालय हे सरकारी आहे. संबंधित गर्भवती महिलेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्या सरकारी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. विक्रम यादव यांनी तासगाव ते पुणे एसटीने आणि पुण्यातून दिल्लीपर्यंत विमानाने प्रवास केला. जलदगतीने रक्तदान करणे गरजेचे होते, म्हणून त्यांनी ही धडपड केली. अवघ्या १३ तासात त्यांनी रुग्णालय गाठले होते. जवळपास ३२ हजार रुपये खर्च त्यांना आला. रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांच्यासाठी २२ हजार रुपये जमविले होते. सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींनी त्यांना ही मदत केली होती. विक्रम यादव यांना ही गोष्ट कळाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून १ रुपयासुद्धा न घेण्याचा निर्णय घेतला. जमलेले २२ हजार पुढील उपचारासाठी ठेवावेत, असा सल्ला त्यांनी त्या कुटुंबियांना दिला आणि त्यांनी पुन्हा स्वखर्चाने आपले गाव गाठले. त्यांच्या या गोष्टीनेही रुग्णालय प्रशासन व महिलेचे नातेवाईक भारावून गेले.
रुग्णालयाचा सत्कार
बीएम रुग्णालयाच्यावतीने दोन्ही रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. जगन प्रसाद गर्ग, औषध विभागाचे सहायक आयुक्त शिवशरण सिंह, मुकेश जैन, किशोर गोयल, डॉ. अंकुर गोयल, तसेच रुग्णालयाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
काय आहे ‘बॉम्बे ओ?
‘बॉम्बे ओ’हा रक्तगट सर्वात दुर्मिळ आहे. जगभरात याचे प्रमाण 0.000४ टक्के इतके आहे. भारतात या रक्तगटाच्या केवळ १७९ व्यक्तीच आढळल्या असून यातही पश्चिम महाराष्ट्रात याचे प्रमाण अधिक आहे. मुंबईतील डॉ. वाय. एम. भेंडे यांनी १९५२ मध्ये या रक्तगटाचा शोध लावला होता.