Jayant Patil: जयंत पाटलांभोवती दलबदलू नेत्यांची रेलचेल, निष्ठावान दुरावण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 05:27 PM2022-05-23T17:27:12+5:302022-05-23T18:05:22+5:30
युतीच्या सत्ताकाळात तत्कालीन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याभोवती घुटमळत होते, तर काहीजण राहुल आणि सम्राट महाडीक यांच्याशी सलगी करीत भाजपचे उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील व वैभव नायकवडी यांच्या हुतात्मा गटात सामील होते. काहींनी शिवसेनेचा आधार घेतला होता.
अशोक पाटील
इस्लामपूर : राज्यात महाआघाडीची सत्ता आली आणि पुन्हा स्वयंभू दलबदलू नेते पालकमंत्री जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीत दिसू लागले आहेत. यातील बरेच नेते युतीच्या सत्ताकाळात तत्कालीन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याभोवती घुटमळत होते, तर काहीजण राहुल आणि सम्राट महाडीक यांच्याशी सलगी करीत भाजपचे उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील व वैभव नायकवडी यांच्या हुतात्मा गटात सामील होते. काहींनी शिवसेनेचा आधार घेतला होता; पण राज्यातील वारे फिरल्यानंतर ते पुन्हा जयंतरावांसोबत दिसू लागले आहेत.
वाळवा-शिराळ्यात आता जयंतराज सुरु झाल्यानंतर काही गुंड प्रवृत्तीच्या राजकारण्यांनी हातात पुन्हा घड्याळ बांधून केलेले पाप धुण्याचा प्रयत्न करु लागले आहेत. काहीजण हातात घड्याळ बांधण्यासाठी आतुर आहेत. ते आगामी पालिका निवडणूक व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान संधी शोधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे पडत्या काळात राष्ट्रवादीला साथ देणारे निष्ठावान कार्यकर्ते पुन्हा मागे पडण्याची शक्यता आहे.
इस्लामपुरात शिवसेना भक्कम असल्याचा दावा केला जातो. यातील काहींना हद्दपार केले. त्याची खदखद शिवसेनेत आहे. यातील काहींनी हातात घड्याळ बांधले, तर काहींची राष्ट्रवादीबरोबर हात मिळवून घेण्याची तर काहींची राष्ट्रवादीविरोधी भूमिका आहे. सध्यातरी शिवसेनेत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. अंतिम निर्णय जिल्हा प्रमुख आनंदराव पवार घेणार आहेत. आगामी काळात राष्ट्रवादीबरोबर शिवसेना गेली तर राष्ट्रवादीमध्येच वेगवेगळे अंतर्गत गट उदयास येतील.
पालिका निवडणुकीची अनेकजण वेळ साधणार
एकंदरीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वयंभू दलबदलू नेत्यांची राष्ट्रवादीत रेलचेल राहणार आहे. यामध्ये निष्ठावान कार्यकर्ते मागे पडणार आहेत.