सांगली बाजार समितीत शिवसेनेला डावलल्याने महाविकास आघाडीमध्ये भगदाड, अजितराव घोरपडेंच्या हकालपट्टीची मागणी

By संतोष भिसे | Published: April 20, 2023 05:42 PM2023-04-20T17:42:59+5:302023-04-20T17:43:29+5:30

सर्व निवडणुका स्वतंत्र लढणार

Mahavikas Aghadi split after Shiv Sena was dropped in Sangli Bazar Committee, demand for Ajitrao Ghorpade ouster | सांगली बाजार समितीत शिवसेनेला डावलल्याने महाविकास आघाडीमध्ये भगदाड, अजितराव घोरपडेंच्या हकालपट्टीची मागणी

सांगली बाजार समितीत शिवसेनेला डावलल्याने महाविकास आघाडीमध्ये भगदाड, अजितराव घोरपडेंच्या हकालपट्टीची मागणी

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांच्या निवडणूक रिंगणातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांचे अर्ज काढून घेतल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उमेदवारी वाटपावेळी फसवणूक करत पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेसाठी कोणतेही काम न करता फक्त फायदे घेणाऱ्या अजितराव घोरपडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी वरिष्ठांकडे करणार असल्याचे ते म्हणाले.

विभुते यांच्या घोषणेमुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये भगदाड पडल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यातील सातही बाजार समित्यांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकगठ्ठा लढविण्याचा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये झाला होता. पण जागावाटपादरम्यान गणित विस्कटले. शिवसेनेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

विभुते यांनी सांगितले की, जागा वाटपासंदर्भात १० दिवसांपासून वाटाघाटी सुरु होत्या. सांगली बाजार समितीसाठी गुरुवारी पहाटे पाच वाजेपर्यंत चर्चा सुरु होती. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेला दोन जागा देताना, त्या अजितराव घोरपडे यांना बहाल केल्या. यामुळे त्यांनी शिवसेनेची फसवणूक केली असून, पाठीत खंजीर खुपसला आहे. घोरपडेंना शिवसेनेच्या नावावर खपवू नका अशी आमची मागणी आहे. त्यांनी पक्षासाठी एकही फायद्याचे काम केलेले नाही. त्यांच्यावर पक्षशिस्त भंगाच्या कारवाईसाठी वरिष्ठांकडे मागणी करणार आहोत. पक्षातून हकालपट्टीसाठीही मागणी करणार आहोत. आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत तसा निर्णय झाला. जयंत पाटील, विशाल पाटील, विश्वजित कदम यांनी शिवसेनेचा अपमान केला असून, तो आम्ही विसरणार नाही. त्याचा बदला घेऊ.

सर्व निवडणुका स्वतंत्र लढणार

संजय विभुते यांनी घोषणा केली की, भविष्यात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह सर्व निवडणुका ठाकरे गट स्वतंत्रपणे लढेल.  महाविकास आघाडीमध्ये सामील होणार नाही. त्यासाठीच आज सर्व समित्यांमधील उमेदवारी मागे घेतल्या. येथून पुढे वंचित बहुजन आघाडी व संभाजी ब्रिगेडच्या साथीने निवडणुका लढवल्या जातील.

Web Title: Mahavikas Aghadi split after Shiv Sena was dropped in Sangli Bazar Committee, demand for Ajitrao Ghorpade ouster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.