विधानसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष ‘मिशन मोड’वर; सांगली जिल्ह्यात मविआ, महायुतीत पेच कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 06:05 PM2024-09-25T18:05:46+5:302024-09-25T18:06:53+5:30
सांगली : विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वच विद्यमान आमदारांसह इच्छुकदेखील तयारीला लागले आहेत. तर दुसरीकडे राजकीय ...
सांगली : विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वच विद्यमान आमदारांसह इच्छुकदेखील तयारीला लागले आहेत. तर दुसरीकडे राजकीय पक्षांकडून निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी सुरू झाली आहे. पुढील महिन्यात निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होऊ शकते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आता मिशन मोडवर आहेत. महाआघाडी आणि महायुतीमध्ये काही जागांवरून पेच निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात एकूण आठ विधानसभेच्या जागा आहेत. त्यात सध्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे तीन जागा, भाजपकडे दोन, काँग्रेसकडे दोन, शिवसेनेकडे एक आमदार आहेत. एकूण आठ आमदारांपैकी महाआघाडीकडे पाच तर महायुतीचे तीन आमदार आहे. गेल्या अडीच वर्षांत राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ
सांगली: २०१४ पासून या मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ हे आहेत. गाडगीळ स्वत: इच्छुक असून भाजपमधूनही अन्य तिघेजण इच्छुक आहेत. काँग्रेसकडून सध्या तरी दोघे इच्छुक आहेत.
मिरज : या मतदारसंघाचे २००९ पासून भाजपचे आमदार सुरेश खाडे आहेत. येथेही भाजपकडून खाडे यांचे खासगी स्वीय सहायक इच्छुक आहेत. महाआघाडीकडून जागा कोणत्या पक्षाला जाणार, त्यावरच उमेदवार निश्चित होणार आहे.
शिराळा : सध्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक आहेत. या जागेवर महाआघाडीकडून त्यांची उमेदवारी निश्चित आहे. महायुतीकडून दोघेजण इच्छुक आहेत.
इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र गटाचे आमदार जयंत पाटील आहेत. ते १९९० पासून विधानसभेत इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
पलूस-कडेगाव : या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदम आहेत. महाआघाडीकडून त्यांची उमेदवारी निश्चित असून महायुतीकडून संग्रामसिंह देशमुख यांचे नाव निश्चित आहे.
तासगाव-कवठेमहांकाळ : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र गट) च्या आमदार सुमनताई पाटील आहेत. येथे उमेदवारी बदलून महाआघाडीकडून रोहित पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे. महायुतीचा येथे उमेदवार सध्या ठरलेला नाही.
खानापूर : दिवंगत अनिल बाबर आमदार होते. ते शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत. महायुतीकडून सुहास बाबर यांची उमेदवारी निश्चित असून महाआघाडीकडून उमेदवार कोण हे ठरलेले नाही.
जत : विक्रमसिंह सावंत आमदार असून ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले आहेत. महाआघाडीकडून त्यांची उमेदवारी निश्चित आहे. महायुतीकडून भाजपमधील तीनजण इच्छुक आहेत.
निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. त्यामुळे आम्ही त्या दृष्टीने पक्ष संघटनेवर अधिक लक्ष देत आहोत. पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शहर, गाव, गल्लीपर्यंत संघटना मजबूत करण्यावर भर देत आहोत. -देवराज पाटील, जिल्हाध्यक्ष, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी.
निर्णय होईल, तो होईल. मात्र, पक्ष म्हणून आमची संघटना मजबूत असून, गट, बुथ व मंडळ स्तरावर आमचे संघटन अधिक सक्षम करण्यावर आमचा भर आहे. -संजय विभुते, जिल्हाप्रमुख, उद्धवसेना.
भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय उमेदवारीचा निर्णय घेतील. ज्या उमेदवारांची विधानसभेत निवडून येण्याची क्षमता आहे, अशा उमेदवाराला महायुतीच्या वतीने उमेदवारी दिली जाईल.- निशिकांत पाटील, जिल्हाध्यक्ष, भाजप.
काँग्रेसचे संघटन मजबूत आहे. आमच्या वाट्याला येणाऱ्या सर्व विधानसभा मतदारसंघांनुसार मायक्रो पद्धतीने नियोजन केले आहे. -पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.