ना होणार चोरी, ना लागेल आता एअर बंच केबलमधून वीजपुरवठा; महावितरणचा प्रकल्प
By संतोष भिसे | Published: December 23, 2023 02:01 PM2023-12-23T14:01:22+5:302023-12-23T14:01:40+5:30
एअर बंच केबलचे फायदे..जाणून घ्या
सांगली : महावितरणने आता एअर बंच केबलला प्राधान्य दिले आहे. वीजचोरीला आळा आणि विजेच्या धक्क्याने होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी या केबलचा वापर सुरू झाला आहे. भविष्यात जिल्हाभरात त्याचे जाळे पसरविण्याचे महावितरणचे नियोजन आहे.
पहिल्या टप्प्यात कृषी जोडण्यांसाठी ही केबल वापरण्यात येत असून, भविष्यात निवासी वसाहतींमध्येही वापर होणार आहे. सध्या विजेच्या खांबांवर तीन फेजच्या तारा दिसून येतात. त्याऐवजी तीनही फेज एकत्र असलेली केबल वापरण्यात येत आहे. त्यावर जाड कोटिंग असते. त्यामुळे आकडा टाकून चोरी करता येत नाही. चोरून वीज घेण्यासाठी केबलचे आवरण काढण्याचा प्रयत्न केला, तर शॉर्ट सर्किट होऊ शकते. त्यामुळे सध्या कृषी जोडण्यांसाठी तिचा वापर प्राधान्याने सुरू आहे. प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरद्वारे वीजपुरवठ्याचा प्रकल्प राबविला जात आहे. त्यासाठी एअर बंच केबल प्राधान्याने वापरण्यात येत आहे. ऑगस्ट २०२३ पर्यंत अनामत भरलेल्या शेतकऱ्यांना या केबलद्वारे वीज पुरविली जाणार आहे.
भविष्यात जिल्हाभरात निवासी वसाहतींमध्येही या केबलद्वारे वीज पुरविली जाईल. त्यामुळे रस्तोरस्ती लोंबकळणाऱ्या तारा आता दिसणार नाहीत. त्याऐवजी एकच जाड केबल दिसेल. ज्या भागात विजेची चोरी होते, तेथे प्राधान्य दिले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही प्रक्रिया सध्या निविदा स्तरावर आहे.
गर्द झाडी असलेल्या भागात फांद्या तारांना घासल्याने शॉर्ट सर्किट किंवा अन्य दुर्घटना होतात. त्या टाळण्यासाठी फांद्या किंवा झाडे तोडावी लागतात. एअर बंच केबलमुळे वृक्षतोड करावी लागणार नाही. सध्या हरीपूर (ता. मिरज) येथे गर्द झाडीच्या वसाहतींत उघड्या वीजवाहिन्यांऐवजी एअर बंद केबलचे महावितरणचे नियोजन आहे.
एअर बंच केबलचे फायदे
- आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही.
- विजेच्या धक्क्याने माकड किंवा अन्य प्राणी मरण्याच्या दुर्घटनांना आळा.
- केबल तुटून रानात पडली तरी शॉक लागण्याची शक्यता कमी.
- वीजचोरी घटल्याने भारनियमनालाही आळा.
- तार तुटून ऊस किंवा अन्य पिके जळण्याच्या दुर्घटनांना आळा.
सध्या कृषी जोडण्यांसाठी एअर बंच केबलचा वापर केला जात आहे. भविष्यात निवासी वसाहतींमध्येही वापर होणार आहे. वीजचोऱ्यांचे प्रमाण जास्त असलेल्या भागात प्राधान्याने ती वापरली जाईल. - सौरभ माळी, कार्यकारी अभियंता, महावितरण, सांगली ग्रामीण