महेश नाईकच्या खुनाला टोळीयुद्धाची किनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 11:31 PM2019-04-14T23:31:09+5:302019-04-14T23:31:15+5:30
सांगली : येथील गुलाब कॉलनीतील महेश नाईक या तरुणाचा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचे कारण पोलीसदप्तरी रंगले असले तरी, यामागे टोळीयुद्धाची ...
सांगली : येथील गुलाब कॉलनीतील महेश नाईक या तरुणाचा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचे कारण पोलीसदप्तरी रंगले असले तरी, यामागे टोळीयुद्धाची ‘किनार’ आहे. शहरातील दोन गुंडांच्या संघर्षातून नाईक याची ‘गेम’ झाल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. नाईकच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित सचिन डोंगरेसह नऊजण अटकेत आहेत. या टोळीची शंभरफुटी, त्रिमूर्ती कॉलनी, गुलाब कॉलनीत प्रचंड दहशत आहे. टोळीची ही दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
शंभरफुटी व हरिपूर रस्त्यावर राहणाऱ्या दोन गुंडांमध्ये गेल्या आठ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. राजकीय आश्रय व विनासायास मिळणाºया पैशाच्या जोरावर दोघांकडेही गुन्हेगारांची मोठी फौज आहे.
शंभरफुटी रस्त्यावरील गुंड खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात आहे, तर दुसरा गुंड खुनाच्या गुन्ह्यातच जामिनावर बाहेर आहे. जामिनावर असलेला हा गुंड सातत्याने शहरात ठिकाणे बदलून राहतो. दोन दिवसांपूर्वी खून झालेला महेश नाईक व संशयित सचिन डोंगरे हे दोघेही त्याच्याकडे नेहमी जात होते, अशी चर्चा आहे. आर्थिक कारणावरुन नाईकचे या गुंडाशी काही दिवसांपूर्वी बिनसले. त्याने डोंगरेला हाकलून लावले. महेश नाईक याने आपल्याबद्दल या गुंडाचे कान भरल्याचा संशय डोंगरेला आला. यातून त्याने नाईकची ‘गेम’ करण्याचा कट रचला, अशी माहिती पोलिसांनाही मिळाली आहे. पण फिर्यादीत मात्र गतवर्षी बारशाच्या कार्यक्रमात झालेल्या वादातून खून झाल्याचे म्हटले आहे.
नाईकच्या खूनप्रकरणी अटकेत असलेल्या नऊपैकी दोन संशयित अल्पवयीन निघाले आहेत. या टोळीची प्रचंड दहशत आहे. दहशतीला घाबरुन परिसरातील लोक तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. नाईकच्या खुनानंतर टोळीला अटक झाल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या टोळीला ‘मोक्का’ लावावा, यासाठी लोक जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांची भेट घेणार आहेत.
कारागृहात भेट
नाईकचा खून करण्यापूर्वी अटकेत असलेले काही संशयित विश्रामबाग येथील एका हॉटेल व्यावसायिकाच्या संपर्कात होते. कोल्हापुरातील कळंबा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात कोठडीत असलेल्या गुंडाची भेट घेण्यासाठी हे संशयित या हॉटेल व्यावसायिकासोबत गेले होते. तिथे सांगलीतील एका गुंडाची ‘गेम’ करण्याबाबत चर्चा झाली. यासाठी हत्यारांचा पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी कारागृहातील गुंडाकडे केली असल्याचे समजते.
सुदैवाने दोघे बचावले
सचिन डोंगरे याने नाईक याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. तो जागेवरच मृत झाला होता. त्याला सोडविण्यास गेलेल्या गणेश बबलादी याच्यावरही जीवघेणा हल्ला झाला. याचवेळी डोंगरेच्या हातातील हत्यार खाली पडल्याने बबलादी बचावला. आणखी एकटा डोंगरेला रोखण्यासाठी गेला. हातातील हत्यार खाली पडल्याचे डोंगरेला भान नव्हते. हातात हत्यार आहे, असे समजून त्याने तिसºयाच्या पोटात सपासप वार केले. सुदैवाने त्याच्या हातात हत्यार नसल्याने तोही बचावला. खुनानंतर काही संशयितांनी एका पोलिसाला संपर्क साधून खून केल्याची माहिती दिली होती.