म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरण: १३ जणांना अटक, २५ खासगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 11:45 AM2022-06-21T11:45:06+5:302022-06-21T14:47:46+5:30
अटक केलेल्यात सावकार, डाॅक्टर, शिक्षकाचा समावेश. दरम्यान या घटनेमुळे मिरज तालुका हादरून गेला आहे. म्हैसाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सांगली : म्हैसाळ येथील डाॅ. माणिक वनमोरे कुटूंबातील नऊ जणांच्या आत्महत्याप्रकरणी २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून १३ जणांना अटक केली आहे. खासगी सावकाराकडून वारंवार होणारा अपमान, व्याजाच्या पैशासाठी तगाद्यामुळे वनमोरे कुटूंबाने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात समोर आल्याचे पोलिस अधिक्षक दीक्षीत गेडाम यांनी पत्रकार बैठकीत दिली.
अटक केलेल्यांत नंदकुमार रामचंद्र पवार (वय ५२, नदीवेस), राजेंद्र लक्ष्मण बन्ने (५०), अनिल लक्ष्मण बन्ने (३५, दोघे माळेवाडी, नरवाड), खंडेराव केदारराव शिंदे (३७, रा. मारुती मंदिराजवळ), डाॅ. तात्यासाहेब आप्पान्ना चौगुले, रेखा तात्यासाहेब चौगुले (४५, रा. शिंदे रोड), शैलेश रामचंद्र धुमाळ (५६,), संजय ईराप्पा बागडी (५१), अनिल बाळू बोराडे (४८), शिवाजी लक्ष्मण कोरे (६५), विजय विष्णू सुतार (५५), पाडूंरग श्रीपती घोरपडे (५६, सर्व रा. म्हैसाळ, ता. मिरज), प्रकाश कृष्णा पवार (४५, रा. बेडग) या तेरा जणाचा समावेश आहे.
तर आशू शैलेश धुमाळ, अनाजी कोंडीबा खरात, शामगोंडा कमगोंडा पाटील, सतीश सखाराम शिंदे, शिवाजी नामदेव खोत, गणेश ज्ञानू बामणे, शुभदा मनोहर कांबळे, नंदकुमार रामचंद्र धुमाळ, राजेश गणपती होटकर, आण्णासो तातोबा पाटील, नरेंद्र हणमंत शिंदे, अनिल बाबू बारोडे, संजय इराप्पा बागडी (सर्व रा. म्हैसाळ) यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
म्हैसाळ (ता. मिरज) येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी दोन बंगल्यांत विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली होती. जनावरांचे डॉक्टर असलेल्या माणिक यल्लाप्पा वनमोरे यांच्या बंगल्यात डॉ. वनमोरे (४९), पत्नी रेखा (४५), मुलगा आदित्य (१५), मुलगी प्रतिमा (२१), आई आक्काताई (७२), पुतण्या शुभम (२८) यांचा, तर दुसऱ्या बंगल्यात शिक्षक असलेले बंधू पोपट वनमोरे (५२), पत्नी संगीता (४८), मुलगी अर्चना (३०) यांचा मृतदेह आढळून आला होता. एकाच वेळी झालेल्या या सामूहिक आत्महत्येने जिल्हा हादरला आहे.
दोन चिठ्ठ्या सापडल्या
डाॅ. माणिक वनमोरे व त्यांचे बंधू पोपट वनमोरे यांच्या घरात प्रत्येकी एक चिठ्ठी सापडली आहेत. या चिठ्ठीत खासगी लोकांकडून कर्जाने पैसे घेतले आहेत. त्या पैशाची परतफेड करण्यात अडचणी येत आहेत. हे कर्ज व्यापाऱ्यासाठी घेतले होते, असा उल्लेख आहे. पण किती रक्कम घेतली होती, याचा उल्लेख चिठ्ठीत नाही.
शवविच्छेदन अहवाल राखून ठेवला
मिरज शासकीय रुग्णालयात नऊ जणांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा अहवाल राखून ठेवला आहे. या सर्वांनी कोणते विष घेतले. ते कशातून घेतले, याचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होते.
अटक केलेल्यात सावकार, डाॅक्टर, शिक्षकाचा समावेश
या आत्महत्याप्रकरणी केलेल्यात डाॅक्टर, शिक्षक, एसटीवाहकाचा समावेश आहे. तात्यासाहेब चौगुले हे वैद्यकीय डाॅक्टर, अनिल बोराडे हे शिक्षक, संजय बागडी हे मिरज आगारात एसटी वाहक, नंदकुमार पवार याचे बेकरी दुकान तर शैलेश धुमाळ याचा हाॅटेलचा व्यवसाय, प्रकाश पवार याचे स्टेशनरी दुकान आहे. तसेच गुन्हा दाखल असलेल्या खासगी सावकार शैलेश व आशिष धुमाळ याचाही समावेस आहे. दोघावर हद्दपारीची कारवाई झाली होती.
सात पथके रवाना
पोलिसांनी २५ पैकी १३ जणांना अटक केली आहे. उर्वरित संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची सात पथके तैनात करण्यात आली आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कर्नाटक या परिसरात संशयितांचा शोध सुरू आहे.