म्हैसाळमधील ९ जणांची सामूहिक आत्महत्या नव्हे तर हत्याकांड, तपासात धक्कादायक माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 06:34 PM2022-06-27T18:34:55+5:302022-06-27T20:10:37+5:30

जेवणातून विष घालून वनमोरे कुटुंबियाना मारल्याचे उघड

Mahisal mass suicide case: Not suicide but murder, shocking information came to light from the investigation | म्हैसाळमधील ९ जणांची सामूहिक आत्महत्या नव्हे तर हत्याकांड, तपासात धक्कादायक माहिती आली समोर

म्हैसाळमधील ९ जणांची सामूहिक आत्महत्या नव्हे तर हत्याकांड, तपासात धक्कादायक माहिती आली समोर

googlenewsNext

सांगली : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील एकाच कुटुंबातील नऊजणांच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला आज, सोमवारी कलाटणी मिळाली. वनमोरे कुटुंबीयांनी आत्महत्या केली नसून, त्यांना विषारी द्रव्य देऊन त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी सोलापूरच्या दोघांना अटक करण्यात आली असून, गुप्तधनाच्या प्रकरणातून हे हत्याकांड घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आब्बास महंमदअली बागवान (वय ४८, रा. मुस्लीम बाशा पेठ, सरवदेनगर, सोलापूर) व धीरज चंद्रकांत सुरवसे (३०, रा. वसंतविहार ध्यानेश्वरीनगर, जुना पुना नाका, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

म्हैसाळ येथे सोमवार, दि. २० रोजी विष पिल्याने एकाच कुटुंबातील नऊजणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. सकृतदर्शनी तो सामूहिक आत्महत्येचा प्रकार वाटत होता. संपूर्ण राज्यात या प्रकरणाने खळबळ उडाली होती. मृत्यू झालेल्या वनमोरे कुटुंबातील कोणीही मागे राहिले नसल्याने गूढ वाढले होते.

सावकारांच्या त्रासाला कंटाळून हा प्रकार घडल्याचा निष्कर्ष काढत पोलिसांनी परिसरातील २५ जणांवर गुन्हा दाखल करून १९ जणांना अटक केली होती. पोलिसांचा अधिक तपास सुरू होता. आता आणखी दोन संशयितांना अटक करत त्या आत्महत्या नसून सर्वांचे खून करण्यात आल्याचे अधीक्षक गेडाम यांनी सांगितले.

अटकेतील दोघे मांत्रिकच?

अटक केलेले दोघेही मांत्रिकच असून त्यांनीच गुप्तधनाचे आमिष दाखवून वनमोरे कुटुंबाकडून वारंवार पैसे घेतले होते. घटनेच्या आदल्या रात्रीही संशयित म्हैसाळ येथे येऊन गेल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, बागवान व सुरवसे हे दोघे नक्की कोण आणि त्यांनी नऊजणांची हत्या का घडवली याबाबत गेडाम यांनी तपास सुरू असल्याचे सांगत अधिक सांगण्याचे टाळले.

'या' नऊजणांचा खून

डॉ. माणिक यल्लाप्पा वनमोरे, रेखा माणिक वनमोरे, आक्काताई यल्लाप्पा वनमोरे, आदित्य माणिक वनमोरे, प्रतिमा माणिक वनमोरे, शुभम पोपट वनमोरे, पोपट यल्लाप्पा वनमोरे, संगीता पोपट वनमोरे, अर्चना पोपट वनमोरे यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुप्तधनाबाबत भेटी

मृत डॉ. माणिक वनमोरे व पोपट वनमोरे या भावांच्या अनोळखी व्यक्तींसोबत गुप्तधनाबाबत भेटी होत होत्या. यासाठी वेळोवेळी त्यांनी त्या व्यक्तिंना पैसेही दिले होते. त्या व्यक्ती रात्री वनमोरे यांच्या घरीही येत होत्या, अशी माहिती मिळाली. त्यानुसार तपास करत पोलिसांनी सोलापूर येथील दोघांना अटक केली.

जेवणातून देण्यात आले विष

नऊजणांच्या मृत्यूचे कोडे उलगडताना विषारी द्रव्य देऊन त्यांचा दोघांनी खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. १९ रोजी रात्री वनमोरे कुटुंबाला जेवणातूनच हे विष देण्यात आल्याची शक्यता असून, संशयितांकडून घटनाक्रम जाणून घेतला जात आहे. यानंतर याची माहिती देऊ, असे अधीक्षक गेडाम यांनी सांगितले.

अन्य सावकारांचा शोध सुरू

वनमोरे कुटुंबातील नऊजणांच्या मृत्यूनंतर केलेल्या तपासात सावकारांकडूनही त्रास देण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील १९ जणांना अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित सहाजणांचा शोध सुरू असल्याचे अधीक्षकांनी सांगितले.

Web Title: Mahisal mass suicide case: Not suicide but murder, shocking information came to light from the investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.