म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरण: वनमोरे कुटुंबाच्या आत्महत्येमागे तासगाव, करमाळ्याचे मांत्रिक?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 07:08 PM2022-06-24T19:08:25+5:302022-06-24T19:11:46+5:30
सावकारीचा फास लावणारे एव्हाना चव्हाट्यावर आले असले, तरी गुप्तधन काढून देण्याच्या आमिषाने लुटणाऱ्या भोंदू, बुवांनाही बेड्या ठोकण्याची मागणी होत आहे.
म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे कुटुंबाने लाखो रुपयांची माया मांत्रिकाच्या घशात घातल्याची चर्चा आहे. पैशांच्या हव्यासापोटी कर्जाचा डोंगर झाला आणि त्याखालीच नऊ जण हकनाक दबले गेले. त्यांना सावकारीचा फास लावणारे एव्हाना चव्हाट्यावर आले असले, तरी गुप्तधन काढून देण्याच्या आमिषाने लुटणाऱ्या भोंदू, बुवांनाही बेड्या ठोकण्याची मागणी होत आहे.
शिक्षक पोपट आणि डॉ. माणिक वनमोरे यांच्यासह नऊ जणांच्या आत्महत्येला बुवाबाजी आणि तंत्रमंत्र जबाबदार असल्याची चर्चा आहे. सुरुवातीला लाख-दोन लाख रुपये गुंतविल्यानंतर पैशांचा हव्यास वाढत गेला आणि वनमोरे बंधू जाळ्यात अडकत गेले. गुप्तधन किंवा तंत्र-मंत्राच्या पैशांचा विषय असल्याने त्यांनी गावात कोणाकडेही वाच्यता केली नाही. त्यामुळे हे विषय त्यांच्या मृत्यूसोबतच अज्ञात राहिले आहेत. वनमोरे बंधूंनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या-चपाट्यांमध्येही याचा उल्लेख नाही, त्यामुळे हे भोंदू सहीसलामत बाजूला राहण्याची शक्यता आहे.
डॉ. माणिक वनमोरे यांचा करमाळा (जि. सोलापूर) येथील काका नामक एका मांत्रिकाशी संपर्क आल्याचे बोलले जाते. कालांतराने तासगावमधील एका बुवाच्याही संपर्कात होते. म्हैसाळमधील जुन्या घरातील स्वयंपाकघरात गुप्तधन असून ते काढायचे असेल, तर मोठा विधी करायला लागेल, त्यासाठी मोठा खर्च केला पाहिजे, असे त्याने सांगितले होेते. महिन्याला दीड-दोन लाखांची मिळकत असलेले वनमोरे बंधू गुप्तधनाच्या हव्यासाला भुलले आणि मांत्रिकाच्या खिशात पैसे ओतत गेले. घरातले पैसे संपले, महिलांच्या अंगावरील दागिनेही विकले, तरीही मांत्रिकाचा हव्यास संपला नाही आणि वनमोरेंची गुप्तधनाची लालसाही! इतकेच नव्हे, तर पैशांसाठी त्यांनी गावातील पतसंस्था आणि खासगी सावकारांचे उंबरठेही झिजविले. यातूनच लाखो रुपयांच्या कर्जाचा डोंगर झाला.
अजून किती बळी?
पोलिसांनी या बुवांचा व मांत्रिकांचा शोध घेतला नाही, तर अजूनही निष्पापांचे बळी जातच राहणार आहेत. सावकारांना आणि त्यांना सावकारीसाठी पैसे पुरविणाऱ्यांना पोलिसांनी ठोकून काढायला हवे. त्यासोबत ते पैसे लाटणाऱ्या मांत्रिकांच्या मुसक्याही आवळायला हव्यात. गावातील सावकारी समूूळ नष्ट केल्याशिवाय म्हैसाळ गावावरील बदनामीचा ठपका पुसून निघणार नाही, असे ग्रामस्थ सांगतात.
धान्याची पोतीही दिली
गेल्या काही महिन्यांत वनमोरे बंधूंनी पैशांसोबत धान्याची पोतीही संबंधित मांत्रिकाकडे पोहोच केल्याची माहिती मिळाली. करमाळ्याच्या मांत्रिकाने गुप्तधन काढून देणे शक्य नसल्याचे सांगून नंतर त्याच भागातील दुसऱ्या ‘पॉवरफुल’ मांत्रिकाची भेट घालून दिल्याचे समजते.