म्हैसाळ-नरवाड रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा फोटो आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:21 AM2021-05-30T04:21:56+5:302021-05-30T04:21:56+5:30
म्हैसाळ : मिरज तालुक्यातील म्हैसाळ ते नरवाड रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. रस्ता जणू ...
म्हैसाळ : मिरज तालुक्यातील म्हैसाळ ते नरवाड रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. रस्ता जणू मुत्यूचा सापळाच बनल्याच्या प्रतिक्रिया वाहनधारकांतून उमटत आहेत. जिल्हा परिषद प्रशासन या रस्त्याकडे लक्ष देणार की नाही, असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
मिरज तालुक्यातील म्हैसाळ-नरवाड या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून झालेच नाही .म्हैसाळपासून पाच ते सहा किलोमीटरचा हा रस्ता आहे. म्हैसाळपासून नरवाड, माळेवाडी, लक्ष्मीनगर, गायरानवाडी, बारा कोटरी या छोट्या-मोठ्या वाडी-वस्तीवर राहणारे लोक या रस्त्याचा प्रमुख रस्ता म्हणून वापर करतात. या रस्त्यावरून शेतकरी, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, व्यावसायिक, खासगी मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. त्यातच म्हैसाळपासून ते नरवाडपर्यंत रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पाऊस पडल्यास खड्ड्यात पाणी साचल्याने वाहन चालवताना वाहनधारकांना अंदाज येत नाही. पावसामुळे चिखल होत असल्याने दोनचाकी गाड्या घसरण्याचे प्रमाण वाढले असून, लहान-मोठे अपघात घडण्याचे प्रमाण नित्याचेच झाले आहे. या रस्त्यावर सायंकाळी व सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली असून, त्यांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने हा रस्ता लवकरात लवकर करावा अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा नरवाड मधील ग्रामस्थांनी दिला आहे.
कोट
म्हैसाळ-नरवाड रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ-मोठ खड्डे पडले असून, दररोज अनेकजणांचे लहान-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने हा रस्ता तात्काळ करावा. अन्यथा ग्रामस्थांना बरोबर घेऊन आंदोलन करू.
डॉ. रामगोंड पाटील,
उपसरपंच, नरवाड
कोट
म्हैसाळ-नरवाड रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. याबाबत नरवाडमधील ग्रामस्थांनी हा रस्ता नव्याने करण्याबाबत आपण प्रयत्न करावेत, अशी विनंती केली आहे. लवकरच नरवाडमधील ग्रामस्थांना बरोबर घेऊन हा रस्ता करावा, अशी मागणी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे करणार आहे.
मनोज शिंदे-म्हैसाळकर,
उपाध्यक्ष, सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, सांगली