‘म्हैैसाळ’ची थकबाकी 45 कोटीवर
By admin | Published: May 22, 2017 08:31 PM2017-05-22T20:31:43+5:302017-05-22T20:31:43+5:30
म्हैसाळ योजनेसाठी १७ जानेवारीपासून सुमारे साडेसहा टीएमसी पाण्याचा उपसा करण्यात आला आहे. या आवर्तनाचे विजेचे १३ कोटी रूपये थकीत बिल
Next
>ऑनलाइन लोकमत
मिरज(सांगली)दि. 22 - म्हैसाळ योजनेसाठी १७ जानेवारीपासून सुमारे साडेसहा टीएमसी पाण्याचा उपसा करण्यात आला आहे. या आवर्तनाचे विजेचे १३ कोटी रूपये थकीत बिल भरण्यासाठी महावितरणने वीज खंडित केल्याने चार तालुक्यातील शेतक-यांना फटका बसला आहे. म्हैसाळ योजना सुरू राहण्यासाठी नेहमीच टंचाई निधीची प्रतीक्षा करावी लागत आहे. या योजनेचे विजेचे बिल २१ कोटी व पाणीपट्टी ४५ कोटीवर पोहोचल्याने, वसुलीसाठी शेतक-यांच्या सात-बारावर कर्जाची नोंद करण्याची मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे.
द्राक्ष व ऊस पिकाला पाणीटंचाई जाणवू लागल्याने डिसेंबरपासून ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू करण्याची मागणी होती. मात्र लाभार्थी शेतकºयांनी रक्कम जमा केली नसल्याने आवर्तन सुरू झाले नाही. गतवर्षी टंचाई परिस्थितीमुळे मिरज, सांगली व कवठेमहांकाळ येथील साखर कारखान्यांनी तीन कोटी रूपये व शेतक-यांनी ३० लाख रूपये जमा केल्यामुळे म्हैसाळ योजनेचे पंप सुरू झाले. गतवर्षी सोडण्यात आलेल्या पाण्याचे वीज बिल २१ कोटी थकीत असल्याने योजनेचा विद्युत पुरवठा खंडित होता. म्हैसाळच्या आवर्तनासाठी थकीत वीज बिलासाठी लाभक्षेत्रात गावनिहाय पाणीपट्टी वसुलीसाठीच्या मोहिमेस प्रतिसाद मिळाला नसल्याने आवर्तन रखडले. यावर्षी लाभक्षेत्रातील कारखान्यांकडून पाणीपट्टी जमा करण्यास प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदार नाराज होऊ नयेत, यासाठी आवर्तन सुरू करण्याचा निर्णय झाला. यासाठी जानेवारीत टंचाई निधीतून शासनाकडून ४ कोटी रूपये उपलब्ध करून ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू करण्यात आले. त्यानंतर थकीत वीज बिलाच्या उर्वरित २१ कोटी थकबाकीपोटी दरमहा शेतक-यांकडून वसूल करून पाच कोटी रूपये भरण्याची मागणी महावितरणने
केली होती. मात्र जिल्हा परिषद निवडणुका पार पडेपर्यंत ‘म्हैसाळ’च्या वीज बिलाबाबत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे कृष्णा खोरे महामंडळाने ८ कोटी रूपये जमा केले. जानेवारीपासून सुरू असलेल्या चार महिन्यांच्या आवर्तनाचे सुमारे १३ कोटी वीज बिल व पूर्वीची थकबाकी, अशा सुमारे २१ कोटी वीज बिलाच्या मागणीसाठी महावितरणने दि. २० रोजी वीज तोडली आहे. शेतक-यांकडून केवळ अडीच कोटी पाणीपट्टी जमा झाली असल्याने आवर्तन बंद झाले आहे.
मे महिन्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढली असताना, म्हैसाळ योजनेचा विद्युतपुरवठा खंडित झाल्याने मिरज, कवठेमहांकाळ, जत, तासगाव तालुक्यातील शेतकºयांना फटका बसला आहे. योजनेची थकबाकी वाढल्याने पावसाळ्यानंतर डिसेंबरमध्ये आवर्तन सुरू करण्यास अडथळा निर्माण होणार आहे. योजना बंद पडल्याने थकबाकी वसुलीची मोहीम सुरू होणार असून, यापूर्वी २०१० पर्यंतची पाणीपट्टी थकबाकी शेतक-यांच्या सात-बारावर नोंद झाली आहे. २०१६ पर्यंतची पाणीपट्टीची थकबाकी शेतकºयांच्या सात-बारावर नोंद होण्याची शक्यता आहे.