‘म्हैसाळ’च्या मुख्य कालव्याची दुरवस्था
By admin | Published: June 28, 2015 10:44 PM2015-06-28T22:44:35+5:302015-06-29T00:29:05+5:30
जागोजागी गळती : दोन्ही बाजूंनी भगदाडे, अस्तरीकरणाची मागणी
नरवाड : मिरज तालुक्यातील म्हैसाळ प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला अस्तरीकरण करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.कृष्णा खोरे महामंडळाच्या म्हैसाळ प्रकल्पाच्या टप्पा क्र. २ पासून मुख्य कालव्याव्दारे ६ टप्प्याने कवठेमहांकाळ तालुक्याला पाणी नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. १९८४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी म्हैसाळ प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली.वीस वर्षांपूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. नरवाड (ता. मिरज) येथे दुसरा टप्पा करण्यात आला. येथे वितरण हौद बांधून पाणी मुख्य कालव्याव्दारे सलगरेपर्यंत वाहून नेण्यासाठी सिमेंटमध्ये दगडी बांधकाम करण्यात आले. मुख्य कालवा साधारणत: १५ फूट खोल आणि १५ फूट रुंदीचा तयार करण्यात आला.सद्यस्थितीत कालव्याचा २० टक्के भाग बांधकामाचे निसटलेले दगड आणि वहात आलेले खडक यांनी भरला आहे. याची जाणीव असूनही यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी गांधारीची भूमिका घेतली आहे. म्हैसाळ प्रकल्पाचे सध्या आवर्तन बंद असून, किमान यावेळी तरी अस्तरीकरण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. कालव्याला अस्तरीकरण नसल्याने शेकडो हेक्टर जमिनी क्षारपड होत आहेत. अस्तरीकरणाअभावी लाखो लिटर पाणी प्रकल्पातून झिरपून पुन्हा नदीला मिळत आहे. मुख्य कालव्याच्या वितरण हौदात पडणारे पाणी आणि सलगरे येथील पोहोचणारे पाणी मुरत आहे. परिणामी दुष्काळी कवठेमहांकाळ, जत, आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना म्हैसाळ प्रकल्पाचे पाणी यामुळे मृगजळ ठरणार आहे. (वार्ताहर)
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
मुख्य कालव्याच्या बांधकामावेळी ठेकेदार आणि तत्कालीन अधिकारी यांनी अर्थपूर्ण व्यवहार करून उपलब्ध सिमेंटमध्येच कालव्याचे बांधकाम उरकले. यामुळे मुख्य कालव्याचे बांधकाम ढासळू लागले आहे. सद्यस्थितीत कालव्याचा २० टक्के भाग बांधकामाचे निसटलेले दगड आणि खडक यांनी भरला आहे. मात्र अधिकाऱ्यांनी गांधारीची भूमिका घेतली आहे.