घानवड हद्दीत ‘टेंभू’चा मुख्य कालवा फोडला
By Admin | Published: April 1, 2016 01:09 AM2016-04-01T01:09:12+5:302016-04-01T01:27:12+5:30
अज्ञातांचे कृत्य : सात मीटर कालव्याचे नुकसान
विटा : माहुलीच्या पंपगृह टप्पा क्र. ३ ब मधून खानापूर-तासगावकडे जाणारा टेंभू योजनेचा मुख्य कालवा बुधवारी मध्यरात्री घानवड हद्दीत अज्ञात लोकांनी जेसीबीच्या साहाय्याने फोडला. या प्रकाराने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर माहुली येथील पंप बंद करून गार्डीच्या करंज ओढ्यात सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले. घानवड हद्दीत अज्ञातांनी कि. मी. २० मधील निरीक्षण पथाजवळ मुख्य कालवा फोडल्याने कालव्याचे सुमारे सात मीटरचे नुकसान झाले.
टेंभू योजनेच्या खानापूर-तासगाव मुख्य कालव्याच्या कि. मी. २१ मधून करंज ओढ्यातून गार्डीकडे पाणी प्रवाहित करण्यात आले आहे. गार्डी, घानवड व हिंगणगादे हद्दीतील करंज ओढ्यातील ३० बंधारे या पाण्याने भरण्यात येणार होते. बुधवारी सकाळी आ. अनिल बाबर यांच्याहस्ते गार्डी येथे टेंभूच्या पाण्याचे जल्लोषी स्वागत करून पाणी पूजन करण्यात आले होते. त्याचदिवशी मध्यरात्री अज्ञातांनी कि. मी. २० मधील सा. क्र. १९/४५० मीटर येथील मुख्य कालवा जेसीबीच्या साहाय्याने फोडून टेंभूचे पाणी घानवड हद्दीतील साळ ओढ्यात सोडले. या प्रकाराची माहिती गुरुवारी सकाळी ६.३० वाजता टेंभूच्या अधिकाऱ्यांना मिळताच जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता अमोल गुरव, उमेश साळुंखे, व्ही. डी. पाटील कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा माहुली पंपगृहात जाऊन बंद केल्याने गार्डीच्या करंज ओढ्यात येणारे पाणी बंद केले.
हिंगणगादे-घानवडच्या ग्रामस्थांत वादावादी
अज्ञातांनी कालवा फोडून साळ ओढ्यात पाणी सोडल्याने करंजे ओढ्यातून हिंगणगादेकडे जाणारे पाणी बंद झाल्याने हिंगणगादेपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे हिंगणगादेतील ग्रामस्थ संतप्त झाले. त्यानंतर घानवडच्याच अज्ञात लोकांनी कालवा फोडल्याचा संशय घेतल्याने हिंगणगादे व घानवड येथील ग्रामस्थांत काही प्रमाणात वाद झाला. अखेर आ. अनिल बाबर यांच्या मध्यस्थीनंतर या वादावर पडदा पडला. मात्र, सहायक अभियंता अमोल गुरव यांनी विटा पोलिसांत टेंभू योजनेचा कालवा फोडल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)