Sangli: आंध्र प्रदेशातील दरोडाप्रकरणी मुख्य संशयिताला अटक; अडीच कोटींचे सोने जप्त
By शरद जाधव | Published: October 31, 2023 07:15 PM2023-10-31T19:15:41+5:302023-10-31T19:16:16+5:30
एलसीबी, आंध्र प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई
सांगली : आंध्रप्रदेशातील गलाई व्यवसायिकाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून लुटमार करणाऱ्या मुख्य संशयिताला पोलिसांनी जेरबंद केले.नितीन पांडूरंग जाधव (वय ३५, रा. कार्वे ता. खानापूर) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून तब्बल दोन कोटी ४० लाख ५० हजार रुपये किंमतीचे चार किलो सोने जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि आंध्र प्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
टनुकू (जि. पश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश) येथे नामदेव गुरूनाथ देवकर हे गलाईचा व्यवसाय करतात. याशिवाय सोन तारण व्यवसायही त्यांचा आहे. त्यांच्याकडेच कामगार म्हणून काम करणाऱ्या सुरज कुंभार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी १२ सप्टेंबर रोजी देवकर यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून ऐवज लंपास केला होता. या प्रकरणातील तीन संशयितांना यापूर्वीच अटक करत त्यांच्याकडून एक कोटी ७७ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणात संशयित नितीन जाधवचा पोलिसांकडून शोध सुरू होता. रविवारी आंध्र प्रदेश व एलसीबीचे पोलिसांच्या पथकाला माहिती मिळाली की, संशयित जाधव हा विटा-सांगली मार्गावर दुचाकीवरून जात आहे. त्यानुसार पथकाने तिथे जात लिंब गावाजवळ सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याजवळ सोन्याचे दागिने व लगड मिळून आली. केलेल्या चौकशीत त्याने टनुकू येथे साथीदारांसह दरोडा टाकल्याचे सांगितले. यानंतर त्याला अटक करण्यात आली.
पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, आंध्रचे पोलिस उपअधीक्षक सी. सरथ राजकुमार, सी. एच. अंननेवेलू, सी.एच. व्यंकटेशराव, डी. आदीनारायण, सहायक निरीक्षक पंकज पवार, सिकंदर वर्धन आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
चार कोटींचे सात किलो सोने हस्तगत
याच पथकाने यापूर्वी तीन आरोपींना अटक तर एक कोटी ७७ लाखांचे सोने हस्तगत केले होते. यानंतर आता जाधव याच्याकडूनही चार किलो सोने हस्तगत केले आहे. या दरोड्यातील चार कोटी १७ लाख ५० हजार रुपयांचे सोने हस्तगत करण्यात आले आहे.