सांगलीतील पोलीस हत्याप्रकरणातील मुख्य संशयिताला कोल्हापुरात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 03:28 PM2018-07-19T15:28:21+5:302018-07-19T15:30:11+5:30
कानाखाली मारल्याने हत्या केल्याची कबूली
सांगली : जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई समाधान भगवान मांटे (वय २९) यांची धारदार शस्त्राने १८ वार करुन ह्त्या करण्यात आली होती. या हत्येतील मुख्य संशयित झाकीर झुल्फीकार जमादार (वय २८, रा. हडको कॉलनी, लक्ष्मीनगर, कुपवाड रस्ता, सांगली) याला कोल्हापूर येथे गुरुवारी अटक करण्यात आली आहे. दारुचे बिल देण्यावरुन झालेल्या वादातून मांटे यांनी जमादारच्या कानाखाली मारली. त्यामुळेच रागाच्या भरात हत्या केल्याची कबूली जमादार याने पोलिसांना दिली आहे.
सांगलीत विश्रामबाग येथे कुपवाड रस्त्यावर हॉटेल रत्ना डिलक्समध्ये मंगळवारी रात्री पावणेबारा वाजता मांटे यांची हत्या करण्यात आली. हत्येचा थरार हा हॉटेलमधील ‘सीसीटीव्ही’ कॅमेरात कैद झाला होता. कॅमेऱ्यातील फुटेजवरुन संशयितांचा शोध घेण्यात आला. त्यावेळी झाकीर जमादार व त्याच्या दोन साथीदारांची नावं समोर आली होती. अन्सार पठाण (३०) व राजू नदाफ (२९) या साथीदारांना बुधवारी पकडण्यात यश आले होते. मात्र जमादार फरारी होता. तो कोल्हापूरात नातेवाईकांकडे आश्रयाला गेल्याची माहिती मिळाली. त्यानूसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व गुंडाविरोधीचे पथक बुधवारी रात्री कोल्हापूरला रवाना झाले होते. तेथील राजवाडा पोलिसांच्या मदतीने गुरुवारी सकाळी जमादारला जेरबंद केले. त्याला घेऊन दुपारी पथक सांगलीत दाखल झाले. मांटे यांची हत्या करण्यासाठी वापरलेल्या हत्याराबाबत त्याच्याकडे चौकशी केली जात आहे.
मांटे यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार
मांटे यांचे मूळगाव बुलडाणा आहे. २०१३ मध्ये ते सांगली पोलीस दलात भरती झाले होते. केवळ पाच वर्षेच त्यांची सेवा झाली. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करुन त्यांचे पार्थिव बुधवारी सायंकाळी नातेवाईकांना देण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव मूळगावी बुलडाणा येथे नेले. गुरुवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृतदेह बाहेर फेकला
हॉटेल रत्ना डिलक्सच्या आवारात मांटे यांची हत्या झाली. सीसीटीव्ही फुटेजमधूनही ही बाब स्पष्टपणे दिसून येते. मात्र प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी मांटे यांचा मृतदेह गेटबाहेर नेऊन ठेवला. तसेच पाणी मारुन रक्त पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यावेळी मृतदेह हॉटेल बाहेर होता. त्यामुळे पोलिसांनी हॉटेलबाहेर घटना घडल्याचा पंचनामा केला आहे.