जैवविविधता कायम राखून विकास साधावा
By admin | Published: July 28, 2016 12:43 AM2016-07-28T00:43:46+5:302016-07-28T01:17:54+5:30
कस्तुरीरंगन यांचे आवाहन : लोकांशी संवाद साधून सरकारने अहवालाबाबत निर्णय घ्यावा
कोल्हापूर : पश्चिम घाटातील जैवविविधतेला धक्का न लावता, ती कायम राखत याठिकाणी सेवा-सुविधांचे जाळे आणि विकास साधण्यास हरकत नाही. या घाटात जे वास्तव दिसले ते अहवालातून मांडले असून तो समतोल आहे. या अहवालाच्या अंमलबजावणीचा निर्णय सरकारने लोकांशी संवाद साधून घ्यावा, असे आवाहन भारतीय अवकाश संशोधन केंद्राचे (इस्रो) माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी बुधवारी येथे केले.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था (आयएसटीई) व शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय व्याख्यानमालेच्या प्रारंभानिमित्त डॉ. कस्तुरीरंगन कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
डॉ. कस्तुरीरंगन म्हणाले, पश्चिम घाटात सहा राज्यांतील सुमारे पाच कोटी लोक राहतात. त्यांचा उदरनिर्वाह या घाटातील जैवविविधतेवर अवलंबून आहे. त्यामुळे जैवविविधतेच्या सुरक्षेचे कारण सांगून त्यांच्यावर गंडांतर आणता येणार नाही. सरकारने येथील जैवविविधतेच्या सुरक्षेसाठी संबंधित लोकांना साक्षर केले पाहिजे. त्यांना अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापरासाठी प्रवृत्त केले पाहिजे. पर्यावरणाला बाधा पोहोचणार नाही, अशा स्वरूपातील रोजगारनिर्मिती करण्यावर भर देणे आवश्यक आहे. विविध घटक, बाबींचा अभ्यास करून पश्चिम घाटाबाबतचा समतोल अहवाल तयार केला. यासाठी तज्ज्ञांची मदत, नवतंत्रज्ञानाचा वापर आणि स्थानिक लोकांशी संवाददेखील साधला. संबंधित अहवाल सरकारला सादर केला. मार्गदर्शक सूचनांसह त्याची अंमलबजावणी करण्याचे काम सरकारचे आहे.
सरकारने लोकांशी संवाद साधून याबाबतचा निर्णय घ्यावा. अवकाश संशोधनाबाबतच्या केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल त्यांनी सांगितले की, अवकाश संशोधनाला सरकारचा पाठिंबा आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मंगळयानाच्या प्रक्षेपणानंतर पंतप्रधान स्वत: अवकाश संशोधन केंद्रात आले आणि त्यांनी मी तुमच्या पाठीशी असल्याचे संशोधकांना सांगितले. सरकारने बहुतांश मंत्र्यांना अवकाश संशोधन केंद्राला आवश्यक ती सर्व मदत करण्याची सूचना केली आहे. विद्यापीठाच्या पातळीवर नवनवीन आणि समाजोपयोगी संशोधन करण्यावर भर देण्यात यावा. या पत्रकार परिषदेस ‘आयएसटीई’चे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे, तंत्रज्ञान विभागाचे संचालक जयदीप बागी, व्ही. डी. वैद्य, प्राचार्य महादेव नरके, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
एपीजे अब्दुल कलाम यांनी ऊर्जा दिली
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना देश महासत्ता व्हावा असे वाटत होते. त्याचे विवेचन त्यांनी उत्तमरीत्या करून ठेवले असल्याचे डॉ. कस्तुरीरंगन यांनी सांगितले. ते म्हणाले, यासाठी प्रारंभी त्यांनी सन २०२० मध्ये देश महासत्ता होणार, या घोषणेद्वारे युवापिढीला ऊर्जा दिली. महासत्ता होण्यासाठी बारावीपर्यंत अद्ययावत व कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे. यात भाषा, प्रांत, संस्कृती अडथळा ठरू नये अशी त्यांची इच्छा होती. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीदेखील ज्ञानाने अद्ययावत राहावे. त्यातून त्यांनी विद्यार्थ्यांना घडवावे. आरोग्य, पर्यावरण क्षेत्रांसह राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यात विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर त्यांचा भर होता. कृषी व जलसंधारणात देश महासत्ता बनावा, अशी त्यांची इच्छा होती.