म्हैैसाळचे आवर्तन मेअखेर
By admin | Published: May 4, 2016 11:04 PM2016-05-04T23:04:37+5:302016-05-05T00:24:24+5:30
शेतकऱ्यांना दिलासा : चार दिवसात सांगोला परिसरात पाणी सोडणार
मिरज : कोयनेतून पाणी सोडण्यात आल्याने म्हैसाळ योजनेचे पंप बुधवारी पुन्हा सुरू झाले. २० फेब्रुवारीपासून म्हैसाळ योजना सुरू असून, मेअखेरपर्यंत आवर्तन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सुमारे सात कोटी म्हैसाळची पाणीपट्टी जमा झाली असून, चार दिवसांत सांगोला तालुक्यात पाणी सोडण्यात येणार आहे. म्हैसाळच्या पाण्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पाणी टंचाईमुळे म्हैसाळ योजना अडीच महिने सुरू आहे. वसंतदादा, महांकाली, मोहनराव शिंदे या कारखान्यांनी तीन कोटी रुपये व शेतकऱ्यांनी ३० लाख रुपये जमा केल्यानंतर म्हैसाळ योजनेचे पंप सुरू झाले.
या रकमेत एक महिना म्हैसाळचे आवर्तन सुरू ठेवण्यात येणार होते. मात्र मिरजेसह कवठेमहांकाळ, जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाणीपट्टीची रक्कम भरल्याने दोन महिन्यात सुमारे सात कोटी रुपये जमा झाले आहेत. म्हैसाळ योजनेचे यापूर्वी आॅगस्ट ते आॅक्टोबरपर्यंत ५० दिवस आवर्तन सुरू होते. मात्र कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे जूनपर्यंत आवर्तन सुरू ठेवावेल अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
चार दिवसात जतमधून सांगोला परिसरात पाणी सोडण्यात येणार असून, यासाठी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ५० लाख रुपये जमा झाले आहेत. (वार्ताहर)
सात कोटींचे वीज बिल : पाणीपट्टी जमा
म्हैसाळ योजनेच्या सध्या सुरू असलेल्या ७० दिवसांच्या आवर्तनासाठी सुमारे अडीच टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. मात्र म्हैसाळ योजनेची दोन महिन्यांची सात कोटी रुपये वीजबिलाची रक्कम आहे. म्हैसाळ योजना सुरू झाल्यापासून १३ वर्षांत केवळ तीन कोटी रुपये पाणीपट्टी जमा झाली होती. मात्र यावेळी तीन महिन्यांत सात कोटी रुपये पाणीपट्टी जमा झाली असल्याने म्हैसाळचे आवर्तन सुरू आहे.