Sangli: म्हैसाळचा कालवा पुन्हा ओव्हर फ्लो, पिके पाण्यात; बेडग रस्त्यावरील दोन तास वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 07:20 PM2024-02-08T19:20:57+5:302024-02-08T19:23:42+5:30
जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना दुसरीकडे पाण्याची नासाडी
म्हैसाळ : बेडग येथील म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालवा पंप हाऊस टप्पा क्र. तीनमधील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने बुधवारी सकाळी कालवा ओव्हर फ्लो झाला होता. यामुळे आरग बेडग रस्त्यावरून कालव्याचे पाणी वाहत असल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती, कालव्याचे पाणी परिसरातील शेतात घुसल्याने शेतजमिनीसह पिकांचे मोठे नुकसान झाले.
मिरज पूर्व भागात शेतकऱ्यांना २४ तासाला २५ हजार रुपये भरून कालव्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पैसे भरूनही समाधानकारक पाणी मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दुसरीकडे मात्र ओव्हर फ्लोमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे शेतजमिनीमधील माती खरडून गेली आहे. विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटना वारंवार घडतात.
त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विज्ञान माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू असतानाच पुन्हा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने म्हैसाळ योजनेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पंप हाऊसमधील एकूण ११५ पैकी ७२ पंप सुरू आहेत. दुरुस्तीसाठी ४२ कोटी खर्च करूनही विद्युत मोटारींची दुरवस्था आहे. यांत्रिकी विभागासह म्हैसाळ योजनेलाच भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले आहे. पालकमंत्री हटाव म्हैसाळ योजना बचाव, असे म्हणावे लागेल. - विज्ञान माने (जिल्हा संघटक राष्ट्रवादी, सांगली)