‘मोक्का’च्या कारवाईने गुन्हेगारांना मोठा दणका-: इस्लापूरच्या इतिहासातील पहिलीच कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 09:36 PM2019-01-23T21:36:44+5:302019-01-23T21:37:24+5:30
शहर व परिसरात राजकीय वरदहस्ताच्या जोरावर संघटित गुन्हेगारी करुन सामान्य माणसांचे जगणे मुश्किल करुन ठेवलेल्या शहरातील गुंडांच्या दोन टोळ्यांविरुध्द कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-
युनूस शेख ।
इस्लामपूर : शहर व परिसरात राजकीय वरदहस्ताच्या जोरावर संघटित गुन्हेगारी करुन सामान्य माणसांचे जगणे मुश्किल करुन ठेवलेल्या शहरातील गुंडांच्या दोन टोळ्यांविरुध्द कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याखाली ‘मोक्का’चा दणका दिला.
चारच दिवसांपूर्वी पोलीस उपअधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतलेल्या कृष्णात पिंगळे यांनी या टोळ्यांची कुंडली काढत अवघ्या २४ तासात मोक्काचा प्रस्ताव नांगरे-पाटील यांच्याकडे सादर केला होता. शहराच्या आणि पोलीस ठाण्याच्या इतिहासातील ही पहिलीच कारवाई ठरली आहे.
शहरामध्ये खासगी सावकारी, खासगी भूखंडांची लूट आणि मटक्याच्या व्यवसायातून अनेक टोळ्यांनी आपले बस्तान बसवले होते. अवैध व्यवसायातील पैशाच्या जोरावर मिसरुड न फुटलेल्या १५ ते २0 वर्षे वयाच्या मुलांचा सहभाग करुन घेतला जात होता. काम न करता अरेरावीच्या जोरावर पैसे मिळत असल्याने ही टोळकी फोफावली होती. या टोळ्या नशेबाजीला बळी पडल्या आहेत. कोणताही गुन्हा करण्यापूर्वी नशेच्या गोळ्या खाऊन बेधुंद होण्याची नवी पध्दत अलीकडे रुढ झाली आहे. या नशेच्या बेधुंदपणातच तलवारी, कोयते घेऊन शहरात दहशत माजवण्यापर्यंत या टोळक्यांची मजल गेली होती. सामान्य कुटुंबातून पुढे आलेली ही गुन्हेगारी अंगावर सोनसाखळ्या आणि खिशामध्ये नोटा घेऊन फिरु लागली. पैसा कमी पडला की सावज शोधायचे आणि त्याला धमकावून खंडणी मागायची, असे उद्योग वाढले होते. व्यापारीही भीतीपोटी पोलिसांत तक्रार देत नसत. याच खंडणीला गुन्हेगार आणि व्यापाऱ्यांच्या पातळीवर ‘प्रोटेक्शन मनी’ असे संबोधले जाते. आता हा प्रोटेक्शन मनी घेणाराच कोयता घेऊन अंगावर येऊ लागल्याने व्यापाºयांचेही धाबे दणाणले होते.
सहा महिन्यांपूर्वीच पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे हाती घेतलेल्या विश्वास साळोखे यांनी या टोळ्यांवर कायद्याचे घाव घालायला सुरुवात केली. चारच दिवसांपूर्वी पोलीस उपअधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतलेल्या कृष्णात पिंगळे यांनी शहरामध्ये सुरु असलेले गुंडाराज कायमचे मोडीत काढण्यासाठी मोक्का कारवाईचे हे प्रस्ताव तयार केले. त्यावर आयजी नांगरे-पाटील यांनी मंजुरीची मोहोर उठवत संघटित गुन्हेगारी टोळ्यांना दणका दिला आहे.
आर्थिक रसद बंद : खंडणीचा सपाटा
गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांनी सावकारी आणि भूखंड माफियांसह मटक्याचा व्यवसाय हद्दपार केल्यानंतर, गुन्हेगारी क्षेत्रात नव्याने आलेल्या या टोळ्यांची आर्थिक रसद बंद झाली होती. त्यामुळे व्यापारी वर्गाला आपले टार्गेट बनवत या टोळ्यांनी खंडणी वसुलीचा सपाटा लावला होता. आता पोलिस प्रशासनाने ‘मोक्का’ कायद्या अंतर्गत कारवाई केल्याने गुंडगिरीवर चाप बसेल असे अपेक्षा व्यक्त केली जात आहे.