ब्रेकिंग: वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; येत्या 2 दिवसांत गोपीचंद पडळकर भाजपात जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 02:56 PM2019-09-25T14:56:17+5:302019-09-25T14:57:12+5:30
दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या संसदीय बोर्डाची मिटींग होती. अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वातील बैठकीला गोपीचंद पडळकर यांनी हजेरी लावली होती.
सांगली - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची चिन्हं आहेत. सांगली लोकसभा निवडणुकीत वंचितकडून उभे राहिलेले उमेदवार गोपीचंद पडळकर हे स्वगृही परतणार असल्याची माहिती आहे. येत्या 2 दिवसांत कार्यकर्त्यांची चर्चा करुन गोपीचंद पडळकरभाजपाचं कमळ हाती घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते मिळविणारे गोपीचंद पडळकर विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमाविण्याच्या तयारीत आहेत. जत अथवा खानापूर मतदारसंघातून गोपीचंद पडळकर निवडणुकीला उभे राहणार असल्याचं बोललं जात आहे. गोपीचंद पडळकर हे वंचित बहुनज आघाडीला सोडचिठ्ठी देणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. धनगर समाजाचे नेते म्हणून राज्यभरात गोपीचंद पडळकर प्रसिद्ध आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गोपीचंद पडळकर यांनी भाजपा सरकारवर टीका केली होती. मात्र धनगर समाजाचे प्रश्न सत्ताधारी भाजपाच सोडवू शकते असं कार्यकर्त्यांना वाटतं. जर धनगर समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर भाजपामध्ये प्रवेश करण्याचा आग्रह पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्याकडे केला आहे.
दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या संसदीय बोर्डाची मिटींग होती. अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वातील बैठकीला गोपीचंद पडळकर यांनी हजेरी लावली होती. मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून गोपीचंद पडळकर यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरु आहे. सांगली लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी भाजपाच्या संजयकाका पाटील यांना जोरदार टक्कर दिली होती. तब्बल 3 लाखांहून अधिक मते गोपीचंद पडळकर यांना पडली होती.
लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांना जत मतदारसंघातून 53 हजार तर खानापूर मतदारसंघातून 78 हजारांचे मताधिक्य मिळालं होतं. गोपीचंद पडळकर यांच्या वकृत्वामुळे अनेक तरुण त्यांच्यामागे उभा राहतात. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना भाजपात घेऊन जत अथवा खानापूरमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. जतमध्ये विद्यमान भाजपा आमदार विलास जगताप यांच्याविरोधात नाराजी असल्याचं चित्र आहे. त्यामुळे जगताप यांचे तिकीट कापून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी मिळू शकते.