अवकाळीग्रस्तांना भरपाई देण्यास शासनास भाग पाडू : फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 11:42 AM2021-12-06T11:42:37+5:302021-12-06T11:47:05+5:30
राज्यात अवकाळीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. देवेंद्र फडणवीस या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातही दौरा करणार आहेत.
सांगली : अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळायलाच हवी. त्यासाठी राज्य शासनाला मदत देण्यास भाग पाडू, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना दिली.
भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रविवारी माजी आमदार विलासराव जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, सत्यजीत देशमुख, प्रकाश जमदाडे, तमन्नगौडा रवी-पाटील, सुरेंद्र चौगुले आदींच्या शिष्टमंडळाने फडणवीस यांची भेट घेतली. जिल्ह्यात अवकाळीने झालेल्या नुकसानीची माहिती फडणवीस यांना देण्यात आली.
देशमुख यांनी सांगितले की, अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंबासह अन्य पिकांची मोठी हानी जिल्ह्यात झाली आहे. राज्य सरकारकडून पंचनामे अद्याप सुरू झालेले नाहीत. त्याचबरोबर भरपाई मिळण्यास विलंब होत आहे. सामायिक खात्यांची भरपाई देण्यासाठी अडवणूक केली जात आहे. महापूर, कोरोनातून शेतकरी कसाबसा सावरत असताना तसेच दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळीने द्राक्ष, डाळिंब बागा व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. यामुळे शेतकऱ्यांची अतोनात हानी झाली आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. तातडीने पंचनामे होणे आवश्यक आहे. विमा कंपन्याकडून कोणतेही जाचक निकष न लावता त्वरित भरपाई मिळावी.