मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गाखालील भराव वाहून गेल्याने रेल्वेचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:27 AM2021-07-29T04:27:41+5:302021-07-29T04:27:41+5:30
मिरज : कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीच्या महापुराने रुकडी ते गांधीनगरदरम्यान पाच ते सहा ठिकाणी भराव वाहून गेल्याने मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे ...
मिरज : कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीच्या महापुराने रुकडी ते गांधीनगरदरम्यान पाच ते सहा ठिकाणी भराव वाहून गेल्याने मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीसाठी अद्याप पुराच्या पाण्याचा अडथळा असल्याने मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्ग आणखी चार ते पाच दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. पूर ओसरल्यानंतर युद्धपातळीवर रेल्वेमार्ग दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात जोरदार पावसाने पंचगंगा नदीला महापूर येऊन पाणी पात्राबाहेर पडले होते. मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गावर रुकडी ते गूळमार्केटदरम्यान पुराचे पाणी वाहत असल्याने रेल्वेवाहतूक बंद होती. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे गांधीनगर ते रुकडीपर्यंत पाच ठिकाणी सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या अंतरापर्यंत भराव वाहून गेल्याचे पूर ओसरल्यानंतर निदर्शनास आले आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून गेले दोन दिवस रेल्वेमार्ग दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र रेल्वेमार्गाखाली अद्याप तीन फूट पाणी असल्याने यंत्राचा वापर न करता मजुरांकडून खडी व मातीचा भराव टाकण्यास अडचणी येत आहेत. पुराच्या पाण्यामुळे रेल्वेमार्गाचेही नुकसान झाले आहे. काही ठिकाणी रेल्वेमार्गही बदलावा लागणार आहे. काही ठिकाणी रुळाखालील स्लीपरला तडे गेल्याने स्लीपरही बदलावे लागणार असल्याचे सांगण्यात आले.
पुराच्या पाण्याने या कामात अडथळा होत असून, पाणी ओसरताच रेल्वेमार्ग तातडीने दुरुस्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात कृष्णा व पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे मध्य रेल्वे व दक्षिण पश्चिम रेल्वेने कोयना व महालक्ष्मी एक्स्प्रेससह कोल्हापूरकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वेमार्ग बंद असल्याने सध्या कोल्हापुरातून सुटणाऱ्या एक्स्प्रेस मिरजेतून जात-येत आहेत. १ ऑगस्टपासून कोल्हापुरातून वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.