गटबाजी न थांबल्यास ‘मेजर आॅपरेशन’

By admin | Published: July 4, 2017 12:01 AM2017-07-04T00:01:13+5:302017-07-04T00:01:13+5:30

गटबाजी न थांबल्यास ‘मेजर आॅपरेशन’

'Major Operation' | गटबाजी न थांबल्यास ‘मेजर आॅपरेशन’

गटबाजी न थांबल्यास ‘मेजर आॅपरेशन’

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस एक कुटुंब आहे. कुटुंबात भांड्याला भांडे लागणारच. पण त्याचा आवाज कुठंपर्यंत होऊ द्यायचा, हेही लक्षात घेतले पाहिजे. पक्षाच्या मेळाव्यात स्वत:ची भूमिका मांडत असताना, बदनामी होणार नाही याची खबरदारी घ्या. पक्षातील गटबाजी थांबली नाही, तर ‘मेजर आॅपरेशन’ करू, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी इशारा दिला.
पवार यांनी सांगलीत राष्ट्रवादीतील गटबाजीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची झाडाझडती घेतली. याचवेळी निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदावरून हटविण्याचे संकेतही त्यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सोमवारी सांगलीत आले होते. या मेळाव्यात पवार व तटकरे यांनी जिल्ह्यातील गटबाजीवर भाष्य करताना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दम भरला. पवार म्हणाले की, एकमेकांवर टीका केल्याने पक्षाची बदनामी होत असते. त्यासाठी जाहीर मेळाव्यातून टीकाटिपणी टाळावी. तक्रारी असतील तर त्या प्रदेशाध्यक्षांच्या कानावर घाला. पक्षांतर्गत वादावर एकत्र बसून तोडगा काढता येऊ शकतो.
गेली पंधरा वर्षे सत्तेत असल्याने पक्षसंघटनेकडे लक्ष देता आले नाही. आता गाव, तालुका, जिल्हा, शहर कार्यकारिणी करा. प्रत्येक दोन महिन्यातून एकदा जिल्ह्याचा आढावा घ्या. पुढील महिन्यात खासदार सुप्रिया सुळे सांगली दौऱ्यावर येणार आहेत. तासगाव, कवठेमहांकाळसह काही तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दादागिरी केली जात आहे. दहशत पसरविली जात आहे. त्याविरोधात विधिमंडळात आम्ही आवाज उठवू. पक्षाची संघटना केवळ कागदावर नको. पक्षाच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या, तसेच निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना प्रसंगी पदावरून दूर करा, असा सल्लाही पवार यांनी दिली.
कोणी पक्षातून गेले म्हणजे पक्ष संपला, असे होत नाही. मग तो आटपाडी असो अथवा खानापूर तालुका असो. कार्यकर्त्यांनी काम करीत राहावे. शरद पवार यांच्यासारखा राष्ट्रीय विचार असलेला नेता केवळ राष्ट्रवादीकडे आहे. त्यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवा. नवीन कार्यकर्ते तयार करूया. त्यातून उद्याचे जिल्हा परिषद सदस्य, आमदार तयार होतील. सर्वसामान्य लोक राष्ट्रवादीसोबत आहेत. जनतेसाठी आपण काम करतो, हे कृतीतून दाखवून द्या, असा सल्ला त्यांनी दिला.
शहरातील गटबाजीवर थेट हल्ला
महापालिका क्षेत्रातील गटबाजीवर अजितदादांनी थेट हल्ला चढविला. शहरात एक, दोन, तीन, चार गट आहेत, असे सांगितले जाते. असला प्रकार यापुढे चालणार नाही. केवळ एकच गट असला पाहिजे, तोही राष्ट्रवादीचा. यापुढे पक्षाच्या प्रत्येक गोष्टीचा मी आढावा घेणार आहे. तुमच्या तक्रारी आम्ही ऐकून घेऊ. योग्य असेल तिथे दुरुस्तीही केली जाईल. पण एवढे करून तुमच्यात सुधारणा झाली नाही, तर पदावरून बाजूला करावे लागेल, अशा शब्दात अजित पवार यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.
सांगलीची दुरवस्था
जयंतरावांच्या ताब्यात महापालिकेची सत्ता असताना ५०० कोटींचा निधी खेचून आणला. आज शहराची काय अवस्था झाली आहे. रस्ते खड्ड्यात गेले आहेत. भाजपला भरभरून देऊनही जनतेचे हाल सुरू आहेत. महापालिका निवडणुका वर्षभरावर आहेत. सांगलीकरांनी राष्ट्रवादीलाच साथ द्यावी, असे आवाहनही पवार, तटकरे यांनी केले.
सत्तापिपासू लोक बाजूला गेले
राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील काही नेतेमंडळी गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये गेल्याचा उल्लेख करीत, प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले की, सत्तापिपासू लोक पक्षातून बाजूला गेले आहेत. पण जनता आजही राष्ट्रवादीसोबत आहे. इस्लामपुरात काहीजण जयंतरावांची उंची गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर तासगावातील खासदार दहशतीच्या जोरावर राजकारण करीत आहेत. पण अशा शक्तींना राष्ट्रवादी काय आहे, हे कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे.
जयंतरावांचे कसब
आर. आर. आबांनंतर राज्याला जयंत पाटील यांची गरज आहे. सांगली सांभाळून त्यांनी राज्यातही लक्ष घालावे. दोन्हीकडे लक्ष देण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. कोणाची विकेट काढण्यासाठी ‘चायनामन’ पध्दतीने बॉल टाकायचा, हे त्यांना चांगलेच माहीत आहे. अगदी ‘नो बॉल’वरही ते दुसऱ्याला धावचित करू शकतात, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणताच सभागृहात हशा पिकला.

Web Title: 'Major Operation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.