मिरज शहरातील प्रमुख रस्ते बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:28 AM2021-04-23T04:28:28+5:302021-04-23T04:28:28+5:30
मिरज : मिरजेत संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण शहरात फिरणाऱ्या वाहनधारकांना रोखण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्याला जोडणारे मार्ग ...
मिरज : मिरजेत संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण शहरात फिरणाऱ्या वाहनधारकांना रोखण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्याला जोडणारे मार्ग पोलिसांनी बंद केले आहेत. प्रमुख रस्ते बंद केल्याने पोलीस बंदोबस्त असलेल्या मार्गावरूनच वाहनांना जावे लागणार आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. मिरजेतील संपूर्ण बाजारपेठा बंद आहेत. अत्यावश्यक सेवा सुरू असतानाही रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांची कोरोना चाचणीही करण्यात येत आहे. संचारबंदी भंग करून अनेक वाहनचालक शहरात फिरत असल्याने मिरजेतील हिरा हॉटेल चौक, शास्त्री चौक, सिद्धार्थ चौक, मिरज हायस्कूल, गाडवे चौक, सराफ कट्टा चौक, लक्ष्मी मार्केट चौकातील रस्ते पोलिसांनी बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत.
अंतर्गत रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरूच असल्याने प्रमुख रस्ते बंद केल्याने वाहनधारकांना चाप बसणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी काळात मिरजेसारख्या संवेदनशील शहरात दंडुक्याचा वापराशिवाय सर्वांना घरी बसविताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे. लॉकडाऊनमध्ये नियमांच्या पालनाकडे मिरजकर दुर्लक्ष करीत असल्याने विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शहरात लाॅकडाऊन असतानाही रस्त्यावर फिरणाऱ्यांना चोप देण्याऐवजी त्याचे प्रबोधन करण्याची पोलिसांची भूमिका आहे. लाॅकडाऊनमध्ये नागरिकांना घरात बसून नियमांचे पालन करावयास लावणे हे पोलिस व प्रशासनासमोर आव्हान ठरत आहे.