सांगलीतील विट्यात विधवा महिलांना मकर संक्रातीचे वाण, भरली ओटी पाहून फुटला अश्रुंचा बांध 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 04:32 PM2024-01-19T16:32:39+5:302024-01-19T16:32:51+5:30

दिलीप मोहिते  विटा : शासनाने विधवा प्रथा बंदीचे परिपत्रक काढले. पण, समाजात विधवांना अनेक सण, उत्सव, हळदी-कुंकू कार्यक्रमापासून दूर ...

Makar Sankranti Varieties for Widow Women in Vita in Sangli | सांगलीतील विट्यात विधवा महिलांना मकर संक्रातीचे वाण, भरली ओटी पाहून फुटला अश्रुंचा बांध 

सांगलीतील विट्यात विधवा महिलांना मकर संक्रातीचे वाण, भरली ओटी पाहून फुटला अश्रुंचा बांध 

दिलीप मोहिते 

विटा : शासनाने विधवा प्रथा बंदीचे परिपत्रक काढले. पण, समाजात विधवांना अनेक सण, उत्सव, हळदी-कुंकू कार्यक्रमापासून दूर रहावे लागत आहे. त्यामुळे ही प्रथा आजही खोलवर जखम करून जाते. विट्याच्या कवयित्री डॉ. स्वाती शिंदे-पवार यांनी विधवा प्रथा बंदीसाठी दमदार पाऊल टाकले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांनी विधवांना संक्रांतीचे वाण देऊन यथोचित सन्मान केला. ओटी भरल्यानंतर विधवांच्या अश्रूंचा बांध फुटून त्यांना गहिवरून आले.

मकर संक्रात हा सुहासिनींचा आवडता सण. पण विधवा महिलांना सणात कोठेच प्राधान्य नाही. पतीच्या जाण्यानंतर समाजाचे टोमणे, दु:ख, अवहेलना त्यांना सहन कराव्या लागतात, त्यात तिचा काय दोष? याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न समाजाने कधीही केला नाही. परंतु विधवा प्रथा बंद करण्यासाठी विट्याच्या डॉ. स्वाती शिंदे-पवार यांनी समाजाला हाक दिली आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि.१७ मे २०२२ रोजी समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलनाबाबतचे परिपत्रक काढले. तत्पूर्वी विधवांच्या सन्मानासाठी पहिले पाऊल डॉ. स्वाती शिंदे यांच्या माध्यमातून १९९२ साली पडले.

आटपाडी तालुक्यातील शेरेवाडी गावातील विधवा लता बोराडे यांनीही १९९७ पासून पाऊल घराबाहेर टाकले होते. विवाहानंतर २५ व्या दिवशी त्यांना वंध्यत्व आले. त्यानंतर डी.एड्. चे प्रशिक्षण घेणाऱ्या बोराडे यांना दि.८ मार्च १९९५ रोजीच्या महिला मेळाव्यात स्वाती शिंदे यांनी कपाळावर हळदी-कुंकू लावले. त्यावेळी उपस्थित महिलांची कुजबुज सुरू झाली. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून काम सुरूच ठेवले.

विधवा प्रथा बंदीसाठी स्वाती शिंदे-पवार यांनी समाजाला ‘एक हाक.. सन्मानासाठी’चा नारा दिला आहे. मकर संक्रांतीचे औचित्य साधून त्यांनी सुहासिनी महिलांच्या हळदी-कुंकू समारंभानंतर विधवांना एकत्रित करीत संक्रांतीचे वाण दिले.

विधवांना समाजात सन्मान मिळावा, यासाठी धडपड सुरू आहे. परंतु ही धडपड एका-दोघींनी करून चालणार नाही. तर त्यासाठी समाजानेही पुढे येणे गरजेचे आहे. समाजाने बदलावं, विधवा प्रथा बंदी, विधवा विवाह, परित्यक्त्या विवाह यात समाजाने माझ्यासोबत चालावे. -डॉ. स्वाती शिंदे-पवार

Web Title: Makar Sankranti Varieties for Widow Women in Vita in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली