भावे नाट्यगृहाचा मेकओव्हर, दीनानाथ अजून दुरवस्थेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 11:43 AM2019-11-04T11:43:47+5:302019-11-04T11:44:58+5:30
सांगली : सांगलीकरांची सांस्कृतिक भूक भागवणारे भावे नाट्यगृह महापुरानंतर आता सावरले आहे. मोठ्या नुकसानीनंतर व्यवस्थापनाने त्याला पुन्हा नवा चेहरा ...
सांगली : सांगलीकरांचीसांस्कृतिक भूक भागवणारे भावे नाट्यगृह महापुरानंतर आता सावरले आहे. मोठ्या नुकसानीनंतर व्यवस्थापनाने त्याला पुन्हा नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे. १५ नोव्हेंबरपासून राज्य नाट्यस्पर्धेमुळे नाट्यगृह पुन्हा गजबजणार आहे. दुसरीकडे महापालिकेच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची दुरवस्था कायम आहे.
महापुरात दहा दिवस नाट्यगृहात पाच फूट पाणी होते. आसने पाण्याखाली गेल्याने प्रचंड हानी झाली. रंगमंचही पाण्याखालीच राहिला. यानिमित्ताने नाट्यगृहाच्या नूतनीकरणाची संधीच जणू व्यवस्थापनाला मिळाली. साडेसहाशेहून अधिक खुर्च्या बदलल्या. अखंड वीजपुरवठ्यासाठी ४५ किलोवॅट क्षमतेचा जनरेटर बसवला. विंगेतील पडदे, झालरी बदलण्यात येत आहेत. गेली अनेक वर्षे लाल रंगाचे पडदे होते. ते प्रकाशाचे परावर्तन करत असल्याने नेपथ्याला तसेच नाटकाच्या आशयाला बाधक ठरायचे. नवे पडदे निळे आहेत, ते प्रकाश शोषून घेत असल्याने नेमका परिणाम साध्य करता येईल. फक्त दर्शनी पडदाच लाल रंगाचा असेल.
महापुराच्या पाण्यासोबत खूपच मोठ्या प्रमाणात गाळमाती साचली होती. ती उपसण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. नाट्यगृहाच्या भिंती अजूनही पुरेशा वाळलेल्या नाहीत. पाण्याने नादुरुस्त झालेले विद्युत साहित्यही बदलण्यात आले आहे. आता नव्या इनिंगसाठी नाट्यगृह सज्ज झाले आहे.