होळी लहान करा; पोळी दान करा..
By admin | Published: March 11, 2017 10:18 PM2017-03-11T22:18:41+5:302017-03-11T22:18:41+5:30
‘अंनिस’चे पर्यावरणपूरक होळीचे आवाहन
सातारा : ‘होळी लहान करा, पोळी दान करा’ असे स्पष्ट करीत राज्यात होळीचा सण साजरा करताना पर्यावरणपूरक करावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत महाराष्ट्र ‘अंनिस’तर्फे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर आणि प्रधान सचिव प्रशांत पोतदार यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्यभारत येत्या रविवारी होळीचा सण साजरा केला जाणार आहे. होळीच्या सणामध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाण नेवैद्य म्हणून पुरणाची पोळी दिली जाते. एका बाजूला समजामध्ये मोठ्या प्रमाणात कुपोषण आणि गरिबी असताना अत्यंत पौष्टिक अन्न असलेली पुरणाची पोळी ही होळीमध्ये टाकण्याऐवजी ज्यांना पुरणपोळी मिळू शकणार नाही. अशा कुटुंबाना पोळी दान करून होळीचा सण साजरा करावा.
होळीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लाकूडतोड करून लाकडे जाळली जातात. त्यामधून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होते. तसेच होळीच्या निमित्ताने वापरल्या जाणाऱ्या अपशाब्दातून अनेक ठिकाणी तंटे निर्माण होतात. याला पर्याय म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकार यांच्या कल्पक नेतृत्वातून साकारलेला पर्यावरणपूरक होळीचा उपक्रम ‘अंनिस’ गेली अनेक वर्षे राज्यभर राबवत आहे. पर्यावरणाच्या वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर लोकांनी पर्यवरणपूरक होळी साजरी करून त्याला पोळी दान करण्याची जोड द्यावी, असे आवाहन पत्रकात करण्यात आले. आहे. (प्रतिनिधी)
साताऱ्यात दोन ठिकाणी उपक्रम...
महाराष्ट्र ‘अंनिस’च्या सातारा शाखेच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक होळीचे आयोजन केले जाणार आहे. साताऱ्यातील प्रतापसिंहनगर आणि लक्ष्मी टेकडी परिसरात पर्यावरणपूरक होळी आणि ‘होळी लहान करा.. पोळी दान करा’ या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे. वंदना माने, योगेश जगताप, भगवान रणदिवे यांनी या आयोजनात पुढाकार घेतलेला आहे. नागरिकांनी त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘अंनिस’तर्फे करण्यात आलेले आहे.