कवलापूर-अलकूड एमआयडीसी करा : उद्योग आघाडीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:36 PM2017-11-04T23:36:20+5:302017-11-05T00:15:02+5:30
कुपवाड : औद्योगिक विकास महामंडळाने प्रस्तावित कवलापूर-अलकूड एमआयडीसीची प्रक्रिया गतिमान करुन जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना द्यावी.
कुपवाड : औद्योगिक विकास महामंडळाने प्रस्तावित कवलापूर-अलकूड एमआयडीसीची प्रक्रिया गतिमान करुन जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना द्यावी. औद्योगिक वसाहत स्थापन झाल्यानंतर गरजू लघु उद्योजकांना पारदर्शीपणे प्लॉट वाटप करावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देशमुख तसेच औद्योगिक विकास महामंडळाकडे केल्याचे उद्योग विकास आघाडीचे नेते डी. के. तथा दिलीप चौगुले, मनोज भोसले आणि जफर खान यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले की, बºयाच वर्षांच्या कालखंडानंतर सांगली जिल्ह्यात प्रस्तावित कवलापूर व अलकूड या दोन एमआयडीसींची प्रक्रिया गतिमान झाली आहे. यातील कवलापूर एमआयडीसीच्या सीमांच्या आखणीचे निविदा निघाली आहे, तर अलकूड एमआयडीसीबाबत जिल्ह्यातील संभाव्य इच्छुक उद्योजकांची बैठक शुक्रवार, १० रोजी औद्योगिक महामंडळाच्या प्रादेशिक अधिकाºयांनी बोलाविल्याची चर्चा आहे.
औद्योगिक क्षेत्र निर्माण न झाल्याने जिल्ह्याचा औद्योगिक विकास खुंटला आहे. नव्याने उद्योग उभारू इच्छिणाºया उद्योजकांना जागेचा तुटवडा भासू लागला आहे. या पार्श्वभूमीवर औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी गतिमान केलेली प्रस्तावित एमआयडीसीची प्रक्रिया स्वागतार्ह व कौतुकास्पद आहे.
प्रस्तावित एमआयडीसीमध्ये जिल्ह्यातील उद्योजकांनाच प्राधान्याने प्लॉट देण्याची आमची मागणी असणार आहे. तसेच लघु उद्योजकांनाच जास्तीत जास्त प्लॉट वाटप करावेत, जेणेकरुन स्थानिक उद्योजकांसह कामगारांनाही रोजगार मिळेल. महामंडळाने गुंतवणुकीच्या माध्यमातून प्लॉट बळकावू इच्छिणाºया ‘बहुउद्योगी’ उद्योजकांना जागा देऊ नयेत.
आकस्मिक दुर्घटना, वाढता विकास, वाढती लोकसंख्या आणि अवयवदानाचा निर्णय घेणाºयांची वाढती संख्या गृहित धरुन गरजू रुग्णांना नाशिक, पुणेसारख्या शहरापर्यंत अवयव पोहोचविण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरसारख्या प्रणालीसाठी एका औद्योगिक क्षेत्रात किंवा प्रस्तावित एमआयडीसीमध्ये एअर अॅम्ब्युलन्स हेलिपॅडची जागा निर्माण करावी. जुन्या व प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रात फार्महाऊस, बगीचा आदी नियमबाह्य कारणांसाठी भूखंडांचा वापर केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही दिलीप चौगुले, मनोज भोसले आणि जफर खान यांनी यावेळी केली.