कोयनेचे पाणीनियोजन आणीबाणी स्तरावर करा, भारत पाटणकर यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 12:36 PM2023-11-27T12:36:17+5:302023-11-27T12:36:41+5:30
फडणवीस यांच्यासोबत बैठकीसाठी प्रयत्न
सांगली : कोयना धरणातील पाण्याच्या ढोबळ आणि अशास्त्रीय नियोजनामुळे सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना करावा लागण्याची भीती आहे. शासनाने उपलब्ध पाण्याचे नियोजन आणीबाणी स्तरावर करावे, असे आवाहन पाणी धोरण संघर्ष मंचाचे सहनिमंत्रक भारत पाटणकर यांनी केले आहे. यासंदर्भात चर्चेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठकीची विनंती केली आहे.
उपमुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोयना धरणातीलपाणी वापराची तूट १९.७१ टीएमसी आहे. ३५ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरायचे आहे. त्यापैकी १२ टीएमसी पिण्यासाठी व सिंचनासाठी वापरण्याचा विचार शासन करत आहे. याचा वीजनिर्मितीवर व उपसा सिंचन योजनांवर काय परिणाम होणार याचा विचार आवश्यक आहे. या स्थितीत राज्यासाठी ग्रीडमधून वीज घेण्याचे नियोजन करावे लागेल. त्यामुळे १२ टीएमसी पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी वळवता येईल. हा निर्णय आणीबाणीच्या पातळीवर घ्यावा.
पाटणकर यांनी सांगितले की, कोयना धरणात सध्या ८० टीएमसी पाणी वापरासाठी उपलब्ध आहे. त्यापैकी ३५ टीएमसी वीजनिर्मितीसाठी गेल्यास ४५ टीएमसी पिण्यासाठी व सिंचनासाठी राहते. त्यात आणखी १२ टीएमसी वळवले, तर ५७ टीएमसी होते. मात्र याच्या उपलब्धतेसाठी गांभीर्याने विचार करावा लागेल.
टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या योजनांतून पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होते. बेकायदा उपसा होतो. त्याविरोधात कडक धोरण राबवावे. शेवटाकडून सुरुवातीला पाणी वितरणाचे धोरणही काटेकोरपणे राबवावे. प्रसंगी पोलिसांची मदत घ्यावी. यासंदर्भात अधिवेशनापूर्वी व्यापक बैठकीचे नियोजन उपमुख्यमंत्र्यांनी करणे आवश्यक आहे.