द्राक्ष दलालांची नोंदणी सक्तीची करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:31 AM2021-01-16T04:31:02+5:302021-01-16T04:31:02+5:30
सांगली : द्राक्ष पीक विमा योजनेचे निकष बदला, द्राक्ष दलालाची नोंदणी सक्तीची करा, या मागणीचे निवेदन कृषी मंत्री दादा ...
सांगली : द्राक्ष पीक विमा योजनेचे निकष बदला, द्राक्ष दलालाची नोंदणी सक्तीची करा, या मागणीचे निवेदन कृषी मंत्री दादा भुसे यांना मुंबई येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आले आहे. यावेळी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ याबाबत आदेश देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.
ते म्हणाले, सध्या द्राक्षांचा हगाम सुरू आहे. राज्यात द्राक्ष बागेचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे; मात्र या द्राक्ष बागांना सुरक्षित विमा कवच नाही. सध्याची पीक विमा योजना कंपनी हिताची आहे, ती केवळ आठ महिन्यांची आहे. त्याच्या अटी चुकीच्या आणि न पूर्ण होणाऱ्या आहेत. द्राक्ष पीक विमा शेतकऱ्यांनी उतरविला आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले तरी योग्य नुकसान भरपाई मिळत नाही. म्हणून पीक विम्याचे निकष बदलणे गरजेचे आहे. जागतिक हवामान बदलत असल्याने मोसम बदलत आहे, तसेच दरवर्षी द्राक्ष हंगामात मोठ्या प्रमाणात द्राक्ष दलालाकडून शेतकऱ्याची फसवणूक होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोट्यवधीचा फटका दलालांनी घेतला आहे. दलालांची कुठेही नोंदणी नाही आणि त्यांची कागदपत्रेही कुठेच उपलब्ध नाहीत. यामुळे दलाल काही काळ चोख व्यवसाय करतात आणि शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांना गंडा घालून पसार होतात. अशा प्रकारच्या घटना अनेक घडल्या आहेत. या दलालांना शिस्त लावण्यासाठी बाजार समिती किंवा पोलीस ठाण्यात दलालांची नोंदणी सक्तीची झाली पाहिजे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तासगाव तालुकाध्यक्ष जोतिराव जाधव, वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव, बस्तवडेचे उपसरपंच संदेश पाटील, महेश जगताप, यशपाल पाटील आदी उपस्थित होते.