मालगावचे शेतकरी ‘म्हैसाळ’पासून वंचित
By admin | Published: April 7, 2016 11:05 PM2016-04-07T23:05:20+5:302016-04-08T00:07:42+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : कालवा फोडाफोडीच्या प्रकाराने शेतकऱ्यांमध्ये संघर्षाची शक्यता
अण्णा खोत -- मालगाव-मालगाव (ता. मिरज) येथे अडथळे पार करीत मोठ्या मुश्किलीने दाखल झालेले म्हैसाळ योजनेचे पाणी कालवा फोडाफोडीच्या विघ्नात सापडले आहे. मल्लेवाडी, एरंडोली व बेडग परिसरात कालवा फोडण्याचे प्रकार होत असल्याने मालगावमधील शेतकरी पाण्यापासून वंचित रहात आहे. नावाल गस्त व कालवा फोडीविरोधातील कारवाईकडे योजनेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे कालव्याच्या बांधावर शेतकऱ्यात मोठा संघर्ष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन पाणी वाटपाच्या नियोजनाबरोबर कालवा फोडीविरोधात कडक पाऊल न उचलल्यास शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मालगावमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या प्रतिसादाने अंदाजे १५ लाख पाणीपट्टी जमा झाल्याने योजनेचे पाणी अनेक अडथळे पार करीत मालगावमध्ये दाखल झाले आहे. मात्र कालवा फोडाफोडीच्या विघ्नाने पाणी मालगावला येण्याऐवजी मल्लेवाडी, एरंडोली व बेडग परिसरात वाहू लागल्याने मालगावचे लाभधारक शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. कालव्यातून पाणी पुढे मालगावपर्यंत सरकत नसल्याने जि. प. सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे तसेच ग्रामपंचायतीचे गटनेते प्रदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली १०० शेतकऱ्यांनी बेडग रेल्वेस्टेशनपर्यंतच्या कालव्याची पाहणी केली. मल्लेवाडी, एरंडोली व बेडग येथे कालवे फोडल्याचे निदर्शनास आले. कालवे फोडले जात असल्याने मालगावला पाणी येत नसल्याची तक्रार अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. अधिकाऱ्यांनी गस्त सुरु असल्याचे सांगितले, मात्र गस्तीवर असणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांनी आपले कोणी ऐकतच नसल्याचे सांगत हात वर केले. मालगावच्या संतप्त शेतकऱ्यांनी स्वखर्चाने जेसीबीच्या साहाय्याने फोडलेले कालवे मुजवून मालगावकडे पाणी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कालवा फोडण्याचे प्रकार सुरुच आहेत. मुख्य कालव्यात अगोदरच कमी दाबाने पाणी सोडण्यात आले आहे, अशात कालवा फोडीने मालगावचे शेतकरी संतप्त आहेत. कालवा फोडण्यावरुन शेतकऱ्यांत संघर्षाची शक्यता नाकारता येत नाही.
पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी न देण्याची भूमिका घेणारे अधिकारी लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळावे याबाबत उदासीन असल्यानेच गोंधळ निर्माण होत असल्याचा आरोप प्रदीप सावंत यांनी केला आहे. म्हैसाळ योजनेच्या पाणी मिळविण्यासाठी शेतकरी आक्रमक असल्याने अघटित घटना घडण्यापूर्वी कालवा फोडणाऱ्याविरोधात कडक पाऊल उचलून सुरळीत पाणी वाटपाचे नियोजन न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना भुर्दंड : बड्या शेतकऱ्यांवर वॉच
म्हैसाळ योजनेची पाणीपट्टी भरण्याकडे ४० पासून १०० एकरापर्यंतच्या बड्या शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. नेहमीच अल्पभूधारक शेतकऱ्यांचा पाणीपट्टीस प्रतिसाद असतो. बड्या शेतकऱ्यांना कडक उन्हाळ्यातही योजनेच्या पाण्याची गरज नाही का? ते पाण्याचा लाभच घेत नाहीत का? अशी शंका अल्पभूधारक शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. बडे शेतकरी योजनेच्या पाण्याचा लाभ घेतात की नाही, यासाठी शेतकऱ्यांनीच वॉच ठेवला आहे.
मालगाव परिसरातील शेतकऱ्यांतही म्हैसाळच्या पाण्यावरून कुरबुरी सुरू
पाठीमागील गावातून कालवा फोडण्याचे प्रकार होत असल्याने मालगावात पाणी येणे व बंद होणे हा प्रकार सुरु असल्याने पाण्याअभावी द्राक्षासह इतर पिके धोक्यात आली. म्हैसाळच्या पाण्याने ही समस्या मिटणार असल्याने पाणी मिळविण्यावरुनही कुरबुरी सुरु आहे. मुख्य कालव्यात कमी दाबाने पाणी सोडल्याने समस्या वाढत आहेत. पाणी प्रवाह वाढविण्याची मागणी आहे.