मालगाव ग्रामपंचायतीस टाळे ठोकण्याचा इशारा
By admin | Published: July 17, 2014 11:34 PM2014-07-17T23:34:56+5:302014-07-17T23:41:03+5:30
सोमवारी आंदोलन : नियमित अधिकारी नेमा
मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथे गेल्या पाच महिन्यांपासून कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी नसल्याने त्याचा विकास कामांवर परिणाम झाला आहे. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी नियुक्तीसाठी संघर्ष करुनही मिरज पंचायत प्रशासन कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी देण्यास टाळाटाळ करीत असल्याने दि. २१ जुलै रोजी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी एम. आर. सरगर यांची बदली झाल्यापासून येथे प्रभारी ग्रामविकास अधिकाऱ्यांवर ग्रामपंचायतीचे कामकाज चालविले जात आहे. परिणामी चाळीस हजार लोकसंख्येचा गावकारभार रुतला आहे. ग्रामविकास अधिकारी आनंदा ढेरे यांची नियुक्ती होती. त्यांना पदोन्नती मिळाल्याने पुन्हा खंडेराजुरीचे ग्रामविकास अधिकारी सरगर यांच्याकडे प्रभारी कारभार देण्यात आला आहे. त्यांच्याकडे खंडेराजुरी आणि मालगावचा कारभार सोपविल्यामुळे ग्रामस्थांची अडचण होत आहे. प्रशासनाने स्वतंत्र ग्रामविकास अधिकारी द्यावा जेणे करून मालगावच्या अडीअडचणी सोडविण्यात अडचणी येणार नाहीत. पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ग्रामविकास अधिकाऱ्यांची कायमस्वरुपी नेमणूक न झाल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांची कायमस्वरुपी नेमणूक न केल्यास दि. २१ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)
ग्रामपंचायतीस कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकाऱ्यांची गरज आहे. आम्ही लेखी पत्र देऊनही प्रशासनाने ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या नेमणुकीकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे ग्रामस्थांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे, तो योग्य आहे. वेळ पडल्यास आम्हालाही ग्रामस्थांच्या भूमिकेला समर्थन द्यावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया सरपंच प्रदीप सावंत यांनी व्यक्त केली.