मालगाव सर्वात मोठी तर जांभूळवाडी लहान ग्रामपंचायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:14 AM2020-12-28T04:14:49+5:302020-12-28T04:14:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने ऐन थंडीतही गावोगावी राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असलेल्या गावांपैकी सर्वात मोठ्या मालगाव व सर्वात छोट्या जांभूळवाडी या गावांमध्येही राजकीय ‘टशन’ अनुभवास येत आहे.
१५ जानेवारीला जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. या टप्प्यात मालगावसह आरग, एरंडाेली, भिलवडी, विसापूरसह इतर गावांचा समावेश आहे. त्यातही मालगावची लोकसंख्या व मतदारसंख्या सर्वाधिक आहे. एका पंचायत समिती गणाचा गावात समावेश आहे. मालगावमध्ये भाजप, काँग्रेससह स्थानिक आघाड्यांकडून पॅनेलची जुळवाजुळव सुरू आहे. जिल्ह्यातील काही मोठ्या ग्राामपंचायतींमध्ये या गावाचा समावेश होत असतो.
सर्वात कमी मतदान असलेल्या जांभुळवाडी (ता. शिराळा) येथेही निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. याठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीतील स्थानिक गट आमने - सामने आहेत. याशिवाय जत तालुक्यातील लमाणतांडा ग्रामपंचायतीचीही मतदारसंख्या मर्यादीत आहे. जत तालुक्यातील सात सदस्यसंख्या असलेल्या बहुतांश ग्रामपंचायतींची सदस्यसंख्या १००० ते १२०० या दरम्यान असली तरी या गावातही राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे.