मालगावच्या ‘त्या’ वसाहतीतील कुटुंबांना मिळाले २५ वर्षांनी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:06 AM2019-01-23T00:06:21+5:302019-01-23T00:07:02+5:30
मालगाव (ता. मिरज) येथील इनाम जमीन वसाहतीत वास्तव्यास असलेल्या सुमारे १८० कुटुंबांना २५ वर्षांनंतर पाणी मिळाले आहे. सुमारे ६ लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायतीने स्वतंत्र नळपाणी पुरवठ्याची सोय केली.
मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथील इनाम जमीन वसाहतीत वास्तव्यास असलेल्या सुमारे १८० कुटुंबांना २५ वर्षांनंतर पाणी मिळाले आहे. सुमारे ६ लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायतीने स्वतंत्र नळपाणी पुरवठ्याची सोय केली. या भागात रस्ते, गटारी व इतर सर्व सुविधा देण्याचे नियोजन केल्याने ही कुटुंबे विकासाच्या प्रवाहात येणार आहेत.
मालगावातील इनाम जमिनीत सुमारे १८० कुटुंबांना भूखंड वाटप झाले. मात्र यासंदर्भातील वादामुळे ग्रामपंचायत दप्तरी नोंद नव्हती. त्यामुळे या भागात नागरी सुविधा नाहीत. केवळ मतदान करण्यापुरतीच ही कुटुंबे हक्कदार राहिली.
विद्यमान गटनेते प्रदीप सावंत यांनी या प्रभागाचे सदस्य राजू भानुसे, स्मिता कुंभारकर यांच्या मदतीने संंबंधित जागेची ग्रामपंचायत दप्तरी भोगवटदार अशी नोंद करण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी भाजपचे सरपंच असलम मुजावर व सदस्यांनी प्रस्तावास संमती दिली. जि. प. बांधकाम सभापती अरुण राजमाने, मिरज पं. स. उपसभापती काकासाहेब धामणे व ग्रा.पं. गटनेते प्रदीप सावंत यांनी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने काम हाती घेतले. यावेळी सतीश बागणे, विलास होनमोरे, शीतल जत्ते आदी उपस्थित होते.
वनवास पुसून काढणार
भविष्यात या भागातील वीज पुरवठा, रस्ते, गटारी या समस्यांबरोबरच घरजागा नावावर करण्यासाठी पुढाकार घेऊन या भागातील ग्रामस्थांनी वीस वर्षे भोगलेला वनवास पुसून काढण्याचे आश्वासन जि. प. बांधकाम सभापती राजमाने, पं. स. उपसभापती काकासाहेब धामणे यांनी दिले.
मालगाव येथे इनाम जमीन वसाहतीतील पाणी पुरवठ्याचे उद्घाटन अरुण राजमाने यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी काकासाहेब धामणे, प्रदीप सावंत, असलम मुजावर, सतीश बागणे आदी उपस्थित होते.