अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्षांची शिक्षा, जिल्हा न्यायालयाचा निकाल; दहीवडीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 01:46 PM2022-06-25T13:46:59+5:302022-06-25T13:47:27+5:30

पीडिता घरी एकटीच होती. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.

Man sentenced to 20 years rigorous imprisonment for sexually abusing a minor girl in a village in Tasgaon taluka sangli | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्षांची शिक्षा, जिल्हा न्यायालयाचा निकाल; दहीवडीतील घटना

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्षांची शिक्षा, जिल्हा न्यायालयाचा निकाल; दहीवडीतील घटना

Next

सांगली : तासगाव तालुक्यातील एका गावात नात्यातीलच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. संभाजी आनंदराव जाधव (वय ३१, रा. दहीवडी, ता. तासगाव) असे आरोपीचे नाव आहे. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश हातरोटे यांनी हा निकाल दिला.

खटल्याची अधिक माहिती अशी की, २९ मे २०१९ रोजी हा प्रकार घडला होता. पीडितेचे आई-वडील वारले असल्याने ती आपल्या बहिणीसोबत राहत होती. पीडितेची बहीण जत येथील नातेवाइकाच्या घरी गेल्याने पीडिता घरी एकटीच होती. २९ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी संभाजी जाधव याने तिच्यावर अत्याचार केला. पीडिता घरी एकटीच असल्याने ती विरोध करू शकली नाही. दुसऱ्या दिवशी पीडितेने आपल्या बहिणीला याची हकीकत सांगितली. पीडितेची एक नातेवाईक मुंबईमध्ये राहण्यास असल्याने ती आल्यानंतर पीडितेच्या बहिणीने ११ जून रोजी तासगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून जाधव याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. पीडितेने जबाबावेळी सरकार पक्षाच्या वतीने जबाब दिला. परंतु उलट तपासावेळी तिने फितूर होत आरोपीच्या बाजूने जबाब दिला. मात्र, सरकारी वकिलांनी उलट तपास घेत सर्व घटनाक्रम तिच्याकडून जाणून घेतला. त्यानंतर सरकारी वकिलांनी शुक्रवारी युक्तिवाद करत जादा शिक्षेची मागणी केली. उपलब्ध पुरावे, साक्षीआधारे न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे यांनी काम पाहिले. पैरवी कक्षाचे पोलीस हवालदार वंदना मिसाळ, शरद राडे, गणेश वाघ यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Man sentenced to 20 years rigorous imprisonment for sexually abusing a minor girl in a village in Tasgaon taluka sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.