गणेश मंडळांना मंडप परवाना देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:33 AM2021-09-07T04:33:10+5:302021-09-07T04:33:10+5:30
सांगली : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना कोरोना कालावधीत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि मंडप उभारणीसाठी परवानगी देण्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त ...
सांगली : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना कोरोना कालावधीत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि मंडप उभारणीसाठी परवानगी देण्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त आणि जिल्हा पोलीसप्रमुख यांना दिले जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सोमवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, महापालिका क्षेत्राचे उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, जिल्हा संघटक दिगंबर जाधव, बजरंग पाटील, शहरप्रमुख रूपेश मोकाशी, विधानसभा क्षेत्रप्रमुख नाना शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. राज्याच्या गृह विभागाने गणेश मंडळांना मंडप घालण्यास आणि चार फुटांच्या मर्यादेत मूर्ती बसवून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. तरीही शासनाची परवानगी नसल्याचे सांगत महापालिकेकडून परवाना दिला जात नाही. शासनाला बदनाम करण्याच्या हेतूने काही मंडळींनी हा उपद्व्याप केला आहे का, याची चौकशी करून तातडीने मंडप आणि इतर परवाना देण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.
यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशाला अधीन राहून मंडळांना मंडप परवानगी देण्याचे आदेश आयुक्त आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना देणार असल्याचे सांगितले. मंडळांनीही कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन साधेपणाने उत्सव साजरा करावा, रक्तदान शिबिरांसारखे विधायक उपक्रम राबवावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.