मणेराजुरी : आगामी सांगली लोकसभा भाजपच जिंकणार : सुभाष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:26 AM2018-09-21T00:26:29+5:302018-09-21T00:30:27+5:30
आगामी सांगली लोकसभेची निवडणूक भाजपच जिंकणार आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांना केले.
मणेराजुरी : आगामी सांगली लोकसभेची निवडणूक भाजपच जिंकणार आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांना केले.मणेराजुरी (ता. तासगाव) येथे खासदार संजयकाका पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, प्रांताधिकारी विकास खरात प्रमुख उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की, केंद्र शासनाने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. त्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. सिंचन योजनेसाठी सरकार निधी कमी पडू देणार नाही. सांगली महापालिका भाजपने एकहाती जिंकली आहे. आगामी लोकसभा ही आपणास जिंकायचीच आहे. संजयकाकांना पुन्हा लोकसभेत पाठविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.
खासदार पाटील म्हणाले की, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्ष पदाची संधी दिली आहे. दिलेल्या संधीचा उपयोग या जिल्ह्यातील सर्व सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी करणार आहे. पाणीपट्टीसाठी महामंडळाने ८१ टक्के रक्कम भरून जिल्ह्यातील सर्व योजना सुरू ठेवल्या आहेत.
आमदार सुरेश खाडे म्हणाले की, संजयकाका आपण एखाद्या ठिकाणी घुसला की ते काम पूर्ण करताच. त्यासाठी तुमच्या घोडदौडीला आमचा पाठिंबा आहे. यास कुणाचाही विरोध असणार नसल्याचेही खाडे यांनी स्पष्ट केले.
माजी सरपंच सचिन जमदाडे यांनी प्रास्ताविक केले. शशिकांत जमदाडे यांनी, मणेराजुरीतील विभागातील वंचित भाग पाण्यासाठी आणून गावातील विविध योजनांसाठी निधी द्यावा, अशी मागणी केली.
यावेळी प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार दीपक वजाळे, तासगावचे नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत, जिल्हा परिषद सदस्य डी. के. पाटील, प्रताप पाटील, सुरेंद्र वाळवेकर, प्रमोद शेंडगे, नितीन नवले, माजी सरपंच तानाजी लांडगे, बाळासाहेब पवार, प्रदीप पवार, अनिल पवार, प्रभाकर तोडकर, विजय एकुंडे, चंद्रकांत कदम, पोपट सावंत आदी उपस्थित होते. प्रशांत पवार यांनी आभार मानले.
मणेराजुरीत पाणी व्यवस्थापनाचे रोल मॉडेल
मणेराजुरीमध्ये म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे योग्य नियोजन केले जात आहे. गावाची पाणीपट्टीही अगोदरच भरणारे हे एकमेव गाव आहे. या गावाच्या पाणी वाटप आणि पाणीपट्टी वसुलीचे व्यवस्थापन एक आदर्श रोल मॉडेल आहे, असे गौरवोद्गार संजयकाका पाटील यांनी काढले.
अधिकारीही झाले भाजपचे सभासद!
पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यक्रमात बसलेल्या सर्वांना भाजप सभासदांचा टोल फ्री क्रमांक सांगून मोबाईलवर डायल करण्यास सांगितले. त्यामुळे एकाचवेळी सर्वजण भाजपचे सभासद झाले. स्टेजवरील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी क्रमांक डायल केल्यामुळे तेही भाजपचे सभासद झाल्यामुळे चांगलीच पंचाईत झाली.
मणेराजुरी (ता. तासगाव) येथे कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खा. संजयकाका पाटील यांचा पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, शशिकांत जमदाडे, तानाजी लांडगे आदी उपस्थित होते.