आटपाडी बाजार समितीसाठी माणगंगा पॅटर्न?
By admin | Published: July 12, 2015 11:34 PM2015-07-12T23:34:10+5:302015-07-13T00:33:12+5:30
१९ जागांसाठी १३८ अर्ज : देशमुख गटाच्या ‘एकला चलो रे’ भूमिकेला घवघवीत यश
अविनाश बाड - आटपाडी -येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत फक्त १९ जागांसाठी तब्बल १३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र ही निवडणूक ‘माणगंगा पॅटर्न’प्रमाणेच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, भाजपबरोबरच शिवसेना आणि कॉँग्रेसच्या भूमिकेकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.
याआधी दि. १६ मे २००८ रोजी बाजार समितीची निवडणूक झाली. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी अनेक राजकीय गटांना संधी दिली. पण सततच्या पाठिंब्याच्या राजकारणामुळे आणि राजकीयदृष्ट्या सामंज्यस्याची भूमिका घेऊनही विधानसभा निवडणुकीत देशमुख गट एकाकी पडला. तेव्हापासून एकला चलो रे म्हणत देशमुख गट कोणत्याही राजकीय गटाशी तडजोड न करता निवडणुका लढवित आहे. त्यामध्ये या गटाला भरघोस यशही मिळताना दिसत आहे.
ताकारी बाजार समितीपासून विभाजन होऊन खानापूर आणि खानापूर बाजार समितीचे विभाजन होऊन दि. २ नोव्हेंबर १९७२ रोजी आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. त्याचे श्रेय बाजार समितीचे संस्थापक सभापती बाबासाहेब देशमुख यांचे. सध्या या संस्थेवर झेंडा फडकविण्यासाठी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत चुरशीने अर्ज भरले आहेत.
कॉँग्रेस वगळता इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी माणगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीही अर्ज दाखल केले होते. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आ. अनिल बाबर यांनी अर्ज माघारी घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप अशी ती निवडणूक झाली.
आता या निवडणुकीत आ. बाबर काय भूमिका घेतात, हेही महत्त्वाचे आहे. उपलब्ध माहितीनुसार, राजेंद्रअण्णांनी कोणत्याच गटाशी कसलीही तडजोड न करण्याचे धोरण या निवडणुकीत अवलंबिले आहे. बाजार समितीमध्ये विकास सोसायट्या मतदार संघासाठी ११ संचालकांच्या जागा आहेत. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत उदयसिंह ऊर्फ संजूकाका देशमुख यांनी विक्रमी मताधिक्यांनी बाजी मारली होती. त्यामुळे या ११ संचालकांच्या जागांवर देशमुख गटाने प्रबळ दावा करणे साहजिक आहे. उर्वरित ग्रामपंचायत-४, व्यापारी-२, प्रक्रिया खरेदी-विक्री -१, हमाल -तोलाई- १ या जागांसाठी चुरस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या निवडणुकीत देशमुुख गटाला टक्कर देण्यासाठी कॉँग्रेस, भाजप, शिवसेना यांची युती होते की नाही आणि युती झाली तरी त्याचा निवडणुकीवर किती परिणाम होईल हे स्पष्ट आहे. भाजपचे गोपीचंद पडळकर हे सध्या तडजोड न करता निवडणुकींना सामोरे जात आहेत. निवडणुकांमध्ये जरी त्यांना अपेक्षित यश मिळत नसले तरी, या निवडणुका त्यांचे सच्चे कार्यकर्ते, समर्थक वाढविणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपने कुणाशीही युती केली नाही तरी या दोघांमध्येच बाजार समितीचा सामना रंगणार आहे. या निवडणुकीत कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अर्ज दाखल केले आहेत. राजकीय तडजोडीतून समितीचे उपसभापतीपद कॉँग्रेसच्या गणपत काटकर यांना देण्यात आले होते. त्यांची काय भूमिका राहणार का कुुणाशी युती करणार, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.
बाजार समिती कुणासाठी?
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा, हा मुख्य उद्देश असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे राजकारणी केवळ सत्तेचे एक केंद्र म्हणून पाहताना दिसत आहेत. चुरशीने एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल करणाऱ्या किती उमेदवारांनी मका १३ रुपये १० पैसे आणि ज्वारी १५ रुपये ३० पैसे या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने व्यापारी शेतकऱ्यांकडून खरेदी करत असताना यावर आवाज उठवला? शेतकऱ्यांच्या हितासाठी कुणी साधी तक्रार केली नाही, पण निवडणुकीसाठी मात्र शेकडो उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.