माणगंगा कारखाना निवडणूक बिनविरोध, तब्बल ३७ वर्षांनंतर सत्तांतर; शिवसेनेच्या तानाजी पाटील गटाकडे सत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 12:21 PM2023-06-01T12:21:39+5:302023-06-01T12:22:02+5:30
भाजपचे नेते, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख व त्यांचे बंधू अमरसिंह देशमुख यांच्या माघारीच्या नाट्यमय घडामोडींमुळे राजकारणात खळबळ
आटपाडी : येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्यात तब्बल ३७ वर्षांनंतर सत्तांतर झाले. कारखान्यात प्रथमच लढणाऱ्या शिवसेनेच्या तानाजी पाटील गटाची बिनविरोध सत्ता आली. सांगोल्यातील शेकापचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पाटील यांना बिनशर्त पाठिंबा देत माघार घेतल्याने सत्ताधारी राजेंद्रअण्णा देशमुख गटानेही सर्व अर्ज माघारी घेण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला.
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातील जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांचे सर्व १७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपचे नेते, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख व त्यांचे बंधू अमरसिंह देशमुख यांच्या माघारीच्या नाट्यमय घडामोडींमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
माणगंगा साखर कारखाना कर्जापोटी जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. त्याची निवडणूक प्रक्रिया पंधरा दिवसांपासून सुरू होती. बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत अनेक खलबते झाली. सत्ताधारी गटाकडून सांगोला तालुक्यामधून शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वतीने दाखल केलेले अर्ज सुरुवातीलाच मागे घेत पाटील गटाला बिनशर्त पाठिंबा देण्यात आला. सांगोला तालुक्यात सुमारे चार हजार मतदान असून, तेथील अर्ज मागे घेतल्यानंतर आटपाडीच्या देशमुखांनीही माघार घेत निवडणूक बिनविरोध केली.
यावेळी तानाजी पाटील म्हणाले की, कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याचे आम्हाला उशिरा कळाले. त्यामुळे अर्ज भरताना अडचणी आल्या. बिनविरोधसाठी सत्ताधारी गटाकडून प्रस्ताव आला होता. वरिष्ठ नेत्यांकडून दबावतंत्र वापरण्यात आले. मात्र, आम्ही निवडणूक लढवण्यावर ठाम होतो. साखर कारखाना खासगी होण्याच्या मार्गावर असून, तो सभासदांचा राहावा, यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचा विश्वास आम्ही नेत्यांना दिला. हीच भूमिका दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे मांडली असता त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला.
अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेनंतर पाटील यांनी कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारची आतषबाजी व गुलालाची उधळण न करण्याच्या सूचना दिल्या.