मांगले-काखे पूल पाण्याखाली गेलाच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:18 AM2021-06-19T04:18:48+5:302021-06-19T04:18:48+5:30
मांगले : गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळा सुरू झाला की मांगले व परिसरातील नागरिकांना अडचण असते ती कोल्हापूर जिल्हा जोडणाऱ्या ...
मांगले : गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळा सुरू झाला की मांगले व परिसरातील नागरिकांना अडचण असते ती कोल्हापूर जिल्हा जोडणाऱ्या वारणा नदीवरील मांगले-काखेदरम्यानच्या पुलाची. कारण वारणा नदीची पाणीपातळी वाढली की सांगली-काेल्हापूर जिल्ह्यांना जाेडणारा मांगले-काखे पूल प्रथम पाण्याखाली जातो. यावर्षी मात्र हा पूल पाण्याखाली गेलाच नाही... कारण या ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी गतवर्षी पावसाळ्यानंतर हा पूल पाडण्यात आला. सध्या येथे नवीन पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या पुलाची चर्चा यंदा होणार नाही? पण नवीन पूल केव्हा पुर्ण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेली ३५ वर्षे कोल्हापूर आणि सांगली जिल्हे जोडणारा दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मांगले-काखे पूल चांदोली धरण झाल्यापासून दरवर्षी पाण्याखाली जातो. हा पूल नदीपात्रातच असल्याने पावसाला सुरुवात हाेताच जिल्ह्यात पहिल्यांदा पाण्याखाली जाण्याचा मान हा पूल मिळवितो. त्यामुळे कोल्हापूर, वारणानगर, शिरोली एमआयडीसी व पन्हाळा-जोतिबाकडे जाणारे शाळकरी विद्यार्थी, कामगार, भाविक व नागरिक या मार्गाचा वापर करत हाेते. पूल पाण्याखाली गेल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. यामुळे पुलाची उंची वाढवावी किंवा नवीन पूल बांधावा, अशी मागणी मांगले परिसरातील ९ गावांनी केली होती. यासाठी गेली २५ वर्षे प्रयत्न सुरू होते. अखेर माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून हा पूल केंद्रीय राखीव फंडातून मंजूर करून घेतला. दिवाळीपूर्वी या पुलाचे बांधकाम करण्यासाठी जुन्या पूल पाडण्यात आला. सध्या नवीन पुलाचे ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे; पण अद्याप महत्त्वाचे काम बाकी असल्याने पूल खुला झालेला नाही.
त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात पाण्याखाली जाणारा मांगले-काखे पूल यावर्षी पाण्याखाली गेलाच नाही. शिवाय, त्याचे अस्तित्वच संपून नवीन पुलाच्या निमित्ताने नवा पूल पुढील वर्षी सेवेसाठी सज्ज असणार आहे.
फोटो : १८ मांगले १
ओळ : वारणा नदीवरील नवीन मांगले-काखे पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.