गिरजवडेतील माळरानावर आंब्याची बाग फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:11 AM2021-05-04T04:11:22+5:302021-05-04T04:11:22+5:30
कोकरूड : गिरजवडे (ता. शिराळा) येथील प्रगतिशील शेतकरी आनंदा बाबूराव शेळके व शिवाजी बाबूराव शेळके या दोन बंधूंनी ...
कोकरूड : गिरजवडे (ता. शिराळा) येथील प्रगतिशील शेतकरी आनंदा बाबूराव शेळके व शिवाजी बाबूराव शेळके या दोन बंधूंनी अनेक वर्षांपासून पडीक असलेल्या खडकाळ माळरानावरील चार एकर क्षेत्रात आंब्याची बाग फुलविली आहे. यातून त्यांनी इतर शेतकऱ्यांपुढे वेगळा आदर्श निर्माण केला आहे. अल्पभूधारक शेतकरी असलेल्या शेळके बंधूंची सर्व जमीन जिरायतीची आहे. त्यापैकीच माळरानावर असणाऱ्या खडकाळ असलेल्या चार एकर क्षेत्रामध्ये त्यांनी दोन वर्षांपूर्वी चारशे आंब्यांच्या झाडांची लावण केली आहे. योग्य पद्धतीचे नियोजन आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सर्व झाडे सेंद्रिय पद्धतीने जगविली आहेत. या झाडांना सोलार सिस्टिमद्वारे पाणी स्वतःच्या विहिरीतून त्यांनी दिले आहे. उत्तम नियोजन, प्रामाणिक कष्ट करून या दोन्ही बंधूंनी माळरानावर फळबाग फुलविली आहे.
शासनाच्या पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेतून या बागेसाठी अनुदान मिळाले असून, खड्डे काढणे, रोपे व पाणी घालणे असे तीन वर्षे मिळणाऱ्या अनुदान योजनेतून ही आंबा बाग लागवड केली आहे. शिराळा तालुक्याच्या उत्तर भागातील सर्वांत मोठी अशी बाग या शेतकरी बंधूंनी फुलविली असल्याने अनेक शेतकऱ्यांनी या बागेला भेट दिली.
कोट
आता एमआरजीएस योजनेतून सर्व शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी शासनाकडून अनुदान मिळत असल्याने शिराळा तालुका कृषी अधिकारी व कृषी सहायक यांच्याशी संपर्क करून लाभ घ्यावा.
- ज्योती बडदे, कृषी सहायक.
कोट
जिरायत क्षेत्र असलेल्या आणि अल्पभूधारक शेतकरी असलेल्या शेळके बंधूंनी आंब्याची बाग लागवडीखाली आणली आहे. इतर पिकांबरोबर शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केल्यास फायद्याची ठरणार आहे.
-ज्योती पाटील, सरपंच, गिरजवडे.
कोट
फळबाग लागवडीसाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांच्यासह प्रशासनाने मदत केली असून, या बागेमुळे ऑक्सिजननिर्मितीला हातभार लागणार असल्याने आनंद होत आहे.
-शेळके बंधू