सुपारी देऊन सांगलीतील कंत्राटदार माणिकराव पाटील यांचा खून?, आतापर्यंत १५ ते २० जणांची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 11:54 AM2022-08-23T11:54:52+5:302022-08-23T11:55:29+5:30
माणिकराव पाटील यांना प्लॉट बघण्यासाठी १० ऑगस्ट रोजी चोरीच्या मोबाईलवरून बोलवले होते. त्यानंतर हा मोबाईल बंद करण्यात आला,. तो आजतागायत बंद आहे.
शीतल पाटील
सांगली : कंत्राटदार माणिकराव विठ्ठल पाटील यांचा खून सुपारी देवूनच करण्यात आल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी सुपारीबहाद्दारांकडे तपासाचा मोर्चा वळविला असून काही पंटरची चौकशीही हाती घेतली आहे. खूनाच्या घटनेला आठवडा लोटला तरी अद्याप उलघडा होऊ शकलेला नाही.
सांगलीतील कंत्राटदार माणिकराव पाटील यांचे अपहरण करण्यात आले होते. कवठेपिरानजवळ वारणा नदीत हात बांधलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी खूनाची शक्यता गृहीत धरून तपासाला गती दिली. आतापर्यंत १५ ते २० जणांची चौकशी करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. पण आतापर्यंत कोणतेही धागेदोरे मिळालेले नाहीत.
पाटील यांच्याशी वाद झालेल्या अनेक संशयितांची पोलिसांनी चौकशी केली. त्यातील काही जणांशी त्यांचा कित्येक महिन्यापासून संपर्कही झाला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे आता पोलीसांना या खूनामध्ये सुपारी दिल्याचा संशय आहे. हा खून अत्यंत नियोजनबद्ध रितीने करण्यात आला आहे.
चोरीच्या मोबाईलवरून त्यांना बोलावणे, त्यानंतर हा मोबाईल बंद ठेवणे, पाटील यांना नदीत ढकलल्यानंतर त्यांची अलिशान गाडी कोंडिग्रे फाटा येथे नेवून लावणे. त्यांना रात्री आठनंतर बोलविणे, सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणीच दबा धरून बसणे या गोष्टीमुळे खूनापूर्वी संशयितांनी मोठी आखणी केल्याचे स्पष्ट होते. शवविच्छेदन अहवालात पाटील यांचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पण हा खून का करण्यात आला याचे कोणतेही धागेदोरे मिळाले नाहीत.
तो मोबाईल अद्याप बंदच
माणिकराव पाटील यांना प्लॉट बघण्यासाठी १० ऑगस्ट रोजी चोरीच्या मोबाईलवरून बोलवले होते. त्यानंतर हा मोबाईल बंद ठेवण्यात आला. पाटील त्यादिवशी तिथे न गेल्यामुळे १३ रोजी पुन्हा याच मोबाईल नंबरवरून फोन करून तुंग येथे बोलविण्यात आले. सुरूवातीला ते आष्टा येथे गेले होते. त्यानंतर ते मोबाईलवर कॉल आल्यामुळे तुंग (ता. मिरज) येथील मिणचे मळ्याजवळ आले. त्यानंतर हा मोबाईल बंद करण्यात आला,. तो आजतागायत बंद आहे.