मनीषा पाटील यांचा राजीनाम्यास नकार

By admin | Published: January 3, 2016 12:51 AM2016-01-03T00:51:11+5:302016-01-03T00:57:15+5:30

जिल्हा परिषद : अन्य पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Manisha Patil's resignation rejected | मनीषा पाटील यांचा राजीनाम्यास नकार

मनीषा पाटील यांचा राजीनाम्यास नकार

Next

सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार सभापतींना दोन दिवसात राजीनामे देण्याचे आदेश सत्ताधारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी दिले. त्यानुसार उपाध्यक्षांसह दोघा सभापतींनी शनिवारी ते दिले असून, अध्यक्षा आणि एक सभापती सोमवारी राजीनामा देणार आहेत. मात्र, कृषी व पशुसंवर्धन सभापती मनीषा पाटील यांनी राजीनाम्यास नकार दिल्यामुळे राजीनामा नाट्य रंगले आहे. त्यांचे पती तानाजी पाटील यांची नेत्यांनी मनधरणी केली, मात्र ती वाया गेल्याने नवीन पदाधिकारी निवडीचा पेच निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, बांधकाम व आरोग्य समिती सभापती गजानन कोठावळे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मनीषा पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती पपाली कचरे, समाजकल्याण समिती सभापती उज्वला लांडगे या पदाधिकाऱ्यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी त्यांना राजीनामे देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लिंबाजी पाटील, कोठावळे आणि कचरे यांनी शनिवारी सायंकाळी राजीनामे सुपूर्द केले. अध्यक्षा होर्तीकर आणि लांडगे सोमवारी शिंदे यांच्याकडे राजीनामे देणार आहेत. मात्र मनीषा पाटील यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यांचे पती तानाजी पाटील यांची मनधरणी करण्यासाठी लिंबाजी पाटील, कोठावळे कृषी समितीच्या दालनात शनिवारी गेले होते. त्यांच्यात तासभर चर्चा झाली. यावेळी तानाजी पाटील म्हणाले की, आमदार अनिल बाबर यांनी सूचना दिल्यास मनीषा पाटील लगेच राजीनामा देतील. तुम्ही बाबर यांच्याशी चर्चा करा.
तानाजी पाटील यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सायंकाळपर्यंत सुरू होते. चर्चा असफल ठरल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे पदाधिकारी निवडीचा पेच निर्माण झाला आहे.
श्रेष्ठींनी शब्द पाळावा : पाटील
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित झाल्यानंतर मनीषा पाटील यांना संधी देण्याचा शब्द राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला होता. परंतु, पदाधिकारी निवडीवेळी अचानक सभापतिपद स्वीकारण्याची सूचना दिली. त्यावेळी उर्वरित कालावधीत मनीषा पाटील यांना अध्यक्षपदाची संधी देण्याचा शब्द दिला होता. हा शब्द राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाळावा, एवढीच आमची मागणी आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चा करावी. मनीषा पाटील लगेच राजीनामा देतील, अशी प्रतिक्रिया तानाजी पाटील यांनी दिली.

Web Title: Manisha Patil's resignation rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.