मनोज जरांगे यांची लढाई शोषितांची नव्हे, वर्चस्वाची; ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 05:22 PM2024-08-12T17:22:54+5:302024-08-12T17:24:00+5:30

विधानसभेला ५० टक्के जागा मिळायला हव्यात

Manoj Jarange patil fight is not for the oppressed, but for supremacy; Commentary by OBC leader Laxman Hake | मनोज जरांगे यांची लढाई शोषितांची नव्हे, वर्चस्वाची; ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांचे टीकास्त्र

मनोज जरांगे यांची लढाई शोषितांची नव्हे, वर्चस्वाची; ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांचे टीकास्त्र

सांगली : छगन भुजबळांचे समर्थक म्हणून माझ्यावर टीका करणारे मनोज जरांगे-पाटील कोणाचे समर्थक म्हणून मैदानात आलेत ते जाहीर करावे. जरांगे यांची लढाई ही शोषितांसाठीची नाही, तर वर्चस्वासाठीची आहे, अशी टीका ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी येथे केली.

तरुण भारत क्रीडांगणावर आयोजित ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यात ब्रिटिशांनी केलेल्या सर्वेक्षणात ओबीसींची संख्या १९३१ मध्ये ५२ टक्के होती. सध्या ६० टक्के ओबीसी आहेत. आम्हाला २८८ मध्ये ५० टक्के जागा मिळाल्या पाहिजेत. ओबीसींचे आरक्षण गेले तर आपण कोठेही दिसणार नाही. आपल्याला तिकीट मागायची वेळ येऊ नये, तर तिकीट देण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये धडकी भरली पाहिजे. ६० टक्के ओबीसींच्या न्याय हक्काच्या योजनांसाठी बजेटमध्ये केवळ एक टक्के तरतूद केली जाते. दुसरीकडे त्यांच्या साखर कारखान्यांना १५०० कोटी दिले जातात. महाराष्ट्रातील पुरोगामी नेते तसेच इतर नेते आरक्षणाबाबत बोलत नाहीत.

आमदार पडळकर म्हणाले, संविधानातील तरतुदीनुसार आरक्षण मिळाले आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी म्हणजे अनेकांना बाधा आणणारा विषय आहे. ते मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. ओबीसीमधील घुसखोरी हाणून पाडण्यासाठी ओबीसींची एकजूट आवश्यक आहे. ओबीसींच्या हक्काचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी सर्वांनी भुजबळ यांच्या पाठीशी ठाम राहिले पाहिजे.

माजी आमदार प्रकाश शेंडगे म्हणाले, ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले आहे. आता शिक्षणातील, नोकरीतील आरक्षण वाचवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. मोठ्या भावाने आपल्या आरक्षणावर हल्लाबोल केला आहे. आरक्षण वाचले नाही, तर पुढच्या पिढ्या गुलाम बनतील. आपण ५७ टक्के असूनही ते छाताडावर नाचतात. हे थांबवण्यासाठी भुजबळांच्या पाठीशी ठाम रहावे.

यावेळी पी. पी. मुंडे, नवनाथ वाघमारे, लक्ष्मण गायकवाड, जे. डी. तांडेल, शब्बीर अन्सारी, ॲड. मंगेश ससाणे, इक्बाल अन्सारी, पांडुरंग तेलकर, हरिदास लेंगरे, संजय विभुते यांची भाषणे झाली. माजी महापौर संगीता खोत यांनी स्वागत केले. माजी नगरसेवक विष्णू माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मैनुद्दीन बागवान, इद्रिस नायकवडी, चिमण डांगे, अरुण खरमाटे, सविता मदने, उर्मिला बेलवलकर, कल्पना कोळेकर, कल्याण दळे, योगेश टिळेकर, ज्ञानेश्वर मेटकरी, संजय यमगर आदी उपस्थित होते.

प्रेमाने आरक्षण मागा

माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. आपण आरक्षण मागतोय म्हटल्यावर मागतकऱ्यांची भाषा मवाळ व सभ्यतेची पाहिजे. ‘आरक्षण हक्काचे’ म्हणताना दुसऱ्याचा बाप कशाला काढता. ‘कोण म्हणतंय देत नाही’ म्हणता तर गेली ७८ वर्षे का गेली याचा विचार करा. घोषणा देताना सरकारचं डोक खाली कराल तर मग आरक्षण कोण देणार? शिव्या देऊन मिळणार काय? यापेक्षा प्रेमाने आरक्षण मागा, दिल्याशिवाय राहणार नाही.

जरांगे यांना आयुष्य अन् बुद्धी मिळू दे

छगन भुजबळ म्हणाले, जरांगे हे रोज नवीन काहीतरी बडबडतात. एका दौऱ्यात त्यांना भोवळ आली म्हणे. खरे तर त्यांनी आराम करायला पाहिजे. कारण आमच्या बरोबर लढायला कोणीतरी पाहिजे. मी त्यांच्यासारख्या शिव्या देणार नाही. पण त्यांना चांगले आयुष्य आणि बुद्धी मिळू दे.

कदम मिलाकर चलना होगा

सर्व समाजाचे वेगवेगळे संत होते, परंतु त्यांनी सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. ‘भेदाभेद अमंगळ’ असे सांगितले. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितल्याप्रमाणे ‘कदम मिलाकर चलना होगा’ आरक्षणाच्या संरक्षणासाठी पाऊल टाका असे आवाहनही भुजबळ यांनी केले.

Web Title: Manoj Jarange patil fight is not for the oppressed, but for supremacy; Commentary by OBC leader Laxman Hake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.