मनोज जरांगे - पाटील यांची गुरुवारी सांगलीत रॅली, जाहीर सभा होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 05:20 PM2024-08-03T17:20:59+5:302024-08-03T17:21:23+5:30
मनोज जरांगे-पाटील यांना जिल्ह्यातील माजी सैनिक संरक्षण देणार
सांगली : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे - पाटील गुरुवारी (दि. ८) सांगलीत येत आहेत. त्याच्या पूर्वतयारीसाठी शुक्रवारी मराठा सेवा संघात बैठक झाली. यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासह जिल्हाभरातून मराठा नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
जरांगे - पाटील यांची सध्या महाराष्ट्रभरात शांतता रॅली सुरू आहे. त्याअंतर्गत ते गुरुवारी सोलापुरातून सांगलीत येत आहेत. सांगलीत दुपारी दोन वाजता मिरजेत येतील. तेथे मराठा समाजातर्फे त्यांचे स्वागत होईल. त्यानंतर सांगलीत विश्रामबाग चौकात येतील. तेथून राम मंदिर चौकापर्यंत पदयात्रा निघेल. फक्त जरांगे - पाटील हेच वाहनात असतील, उर्वरित सर्व जण पायी सहभागी होतील, असे बैठकीत निश्चित करण्यात आले.
राम मंदिर चौकात दुपारी चार वाजता त्यांची जाहीर सभा होईल. सभेवेळी व्यासपीठावर जरांगे - पाटील यांच्याशिवाय अन्य कोणी नसेल. सर्व मराठा नेत्यांसाठी व्यासपीठापुढे व्यवस्था केली जाईल. रात्री जरांगे - पाटील यांचा सांगलीत मुक्काम असेल. दुसऱ्या दिवशी कोल्हापूरसाठी रवाना होतील. रॅली व जाहीर सभेच्या निमित्ताने जिल्हाभरातून सकल मराठा समाज सांगलीत एकवटणार आहे. त्यासाठी महिनाभरापासून गावोगावी बैठका घेतल्या जात आहेत. गावोगावी बॅनरही लावले आहेत.
माजी सैनिकांचे कडे
दरम्यान, मनोज जरांगे - पाटील सांगलीत आल्यानंतर जिल्ह्यातील माजी सैनिक त्यांना संरक्षण देणार आहेत. विश्रामबागपासून राम मंदिर चौकापर्यंत त्यांचे कडे असेल. माजी सैनिकांनी स्वयंप्रेरणेने हा निर्णय घेतल्याचे बैठकीत सांगण्यात आले.